भदंत संघसेना : नवबौद्ध व जुने बौद्ध ही संकल्पनाच चुकीची नागपूर : आज नवबौद्ध आणि जुने बौद्ध असा फरक करण्यात येत आहे. वास्तविकत: बुद्ध धम्माला मानणारा आणि स्वीकारणारा हा बौद्धच आहे. त्यामुळे नवबौद्ध आणि जुना बौद्ध अशी संकल्पना किंवा व्याख्या करणे चुकीचे आहे, जगभरातील बौद्ध हे एकच आहेत, असे स्पष्ट मत महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाखचे प्रमुख भदंत संघसेना यांनी येथे व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे शनिवारी आयोजित विश्व माघ पूजा पर्व आणि महाकरुणा दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नालंदा बुद्धिस्ट सोसायटी, मलेशियाचे अध्यक्ष डॉ. तान हो सुन, भदंत थॅकसे रिनपोछे, जम्बुद्वीप ट्रस्टचे संस्थापक धम्मचारी लोकमित्र, मंगोलियाचे भारतीय राजदूत गोनचिंग गॅनबोल्ड, भदंत सदानंद महास्थवीर, भदंत ज्ञानज्योती स्थवीर, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, भदंत डॉ. खेमधम्मो उपस्थित होते. भदंत संघसेना म्हणाले की, तथागत गौतम बुद्ध यांना याच देशात बोधीसत्त्व प्राप्त झाले. शांती, समानतेचा खरा संदेश येथून देशभर निघाला. बुद्ध धम्म हा भारतातील प्राचीन धम्म आहे. मात्र काळाच्या ओघात बौद्ध धम्म मागे पडला. तथागतांचा शांतीचा संदेश जगपातळीवर पोहोचविण्याची गरज आहे. यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. गतिमान, शीलवान माणूस जगात निर्माण करण्याची गरज आहे. हे काम बुद्धांच्या धम्माच्या माध्यमातून होऊ शकते, असे ते म्हणाले. यावेळी डॉ. तान हो सुन म्हणाले, बुद्धाने प्रेम आणि करुणा, शांतीचा संदेश दिला आहे. जगात शांतता बुद्धांच्या तत्त्वांमुळेच मिळू शकते. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान सर्वांसमोर पोहोचविले पाहिजे. सर्व देशातील बुद्ध धम्म एकच आहे. त्यात कोणतेही अंतर नाही. जे लोक असा प्रचार करीत आहेत, त्यांना धम्माची माहिती नाही. प्रारंभी बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लेह-लद्दाख येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.(प्रतिनिधी) महाकरुणेवर विविध धर्मगुरूंचे मार्गदर्शन यावेळी ‘भगवान बुद्धांची महाकरुणा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा लढा’ यावर विविध धर्मगुरूंनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये इतिहास विशेषज्ञ व विचारक डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहील, पूज्य समाधा आश्रमचे सीरी वाधनदास तलरेजा (बाबाजी), गुरुद्वारा श्री तेगबहादूर साहिबचे प्रचारक सीरी मनदीप सिंह, गुरुमत प्रचार संस्थेचे सीरी मलकीतसिंग बल प्रधान, हार्वेस्ट चर्चचे फादर डेनियल जोसेफ, सेंट थॉमस चर्चचे रेव्ह, गणेश बर्वे, आयकर आयुक्त सुबचन राम, अ.भा. महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री उपाध्य कुलाचार्य श्री न्यायंबास बाबा यांनी आपले विचार व्यक्त केले. नागपूरला सारनाथसारखे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन याला खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित केले. त्यांनी नागपुरात दीक्षा घेतली. त्यामुळे सारनाथसारखे महत्त्व नागपूरला आहे, असे भदंत संघसेना यांनी स्पष्ट केले. तर डॉ. तान हो सुन यांनी नागपुरात आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते, असे सांगितले. नवदीक्षित बौद्ध बांधवांना बुद्ध मूर्तीचे दान थायलंडमधील एका बौद्ध उपासकाने २०० बौद्ध मूर्ती दान दिल्या आहेत. याप्रसंगी या बुद्ध मूर्ती दीक्षाभूमीवर नुकतेच बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या बांधवांना प्रदान करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
जगभरातील बौद्ध एकच
By admin | Published: February 12, 2017 2:30 AM