दयानंद पाईकराव/आनंद शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात अजनी सॅटेलाईट टर्मिनलची घोषणा करण्यात आली होती. आठ कोटी मिळाल्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होऊन भविष्यात या स्थानकावरून नव्या गाड्या सुरु होण्याची शक्यता वाढली आहे.अर्थसंकल्पात खापरी, गोधनी आणि माजरी रेल्वेस्थानकाला आदर्श रेल्वेस्थानकाच्या रुपाने विकसित करण्यासाठी आणि गोधनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्मची उंची वाढविण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात या रेल्वेस्थानकांचे महत्त्व वाढणार आहे. अर्थसंकल्पात १३.७ किलोमीटर लांबीच्या गोधनी-कळमना कॉर्ड लाईनसाठी २ कोटी, गोधनी-नागपूर-खापरी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमसाठी ६ कोटी, अजनीत इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नालॉजीसाठी ६ लाख रुपये देण्यात आले आहेत तर अजनी लोकोशेडची क्षमता वाढविण्यासाठी १.५ कोटी रुपये, अजनीत प्रस्तावित नव्या इलेक्ट्रिक लोकोशेडच्या निर्मितीसाठी २ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये देण्यात आले आहेत. नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डातून ‘डायमंड’ हटविण्यासाठी १० लाख रुपयांची आणि ११ किलोमीटर लांबीच्या चिरीमिरी-नागपूर पॅसेंजर हॉल्ट (नवी लाईन) साठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.रेल्वे क्वॉर्टरमधील समस्या सुटणारअर्थसंकल्पात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडेही लक्ष पुरविण्यात आले आहे. अजनीतील रेल्वे क्वॉर्टरची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात क्वॉर्टरचे छत टपकतात. क्वॉर्टरमधील बहुतांश शौचालयांना दरवाजे नाहीत. अशा स्थितीत अर्थसंकल्पात रेल्वे क्वॉर्टरसाठी ४.४३ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे रेल्वे क्वॉर्टरमधील समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘एफओबी’मुळे होणार नाही चेंगराचेंगरीनागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ पर्यंत नवा रुंद फूट ओव्हरब्रिज तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी ९ लाख ९९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा फूट ओव्हरब्रिज साकारल्यास प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाताना गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होणार नाही. तर नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक १, २ आणि ३ सरळ करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेगाड्या आऊटरवर उभ्या राहणार नाहीत.आरपीएफच्या पाच नव्या पोस्ट, महिलांसाठी बॅरेकदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलासाठी पाच नव्या पोस्ट आणि महिलांसाठी बॅरेक तयार करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी १ लाख ७९ हजार रुपये खर्च येणार आहे. अर्थसंकल्पात यासाठी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नागपूर-नागभीड प्रकल्पाची उपेक्षावर्षानुवर्षे नागपूर-नागभीड या १०६ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज प्रकल्पाचे काम रखडले आहे. या अर्थसंकल्पात या प्रकल्पाता गती मिळण्याची अपेक्षा असताना या प्रकल्पासाठी तुटपुंजी १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढी कमी तरतूद केल्यामुळे हा प्रकल्प साकारण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे, हे विशेष.