लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षात कामे जवळपास ठप्पच होती. २०२१-२२च्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. परंतु प्रभागातील लाख-दोन लाखांची कामे अजूनही ठप्पच असल्याने नागरिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे आठ महिन्यांनंतर निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आहे.
प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांना प्रत्येकी ४५ ते ५० लाखांचा निधी मिळतो. यात वॉर्ड निधी, सिक्स सेव्हन सिक्स, झोनल बजेट आदींचा समावेश आहे. यातून नागरिकांच्या मागणीनुसार गडर लाइन दुरुस्ती, चेंबर दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती, चेंबरवरील झाकणे, रस्ता दुरुस्ती, गट्टू लावणे अशी लहानसहान कामे केली जातात. परंतु मागील वर्षात यासाठी ६५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु ३२ कोटींचाच निधी प्राप्त झाला.
२०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ६६.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यातून अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. प्रभागातील चेंबर दुरुस्ती, गडर लाइन दुरुस्ती, पावसाळी नाल्या दुरुस्ती, अशी अत्यावश्यक कामे थांबली असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. नागरिक नादुरुस्त गडर लाइनमुळे त्रस्त असताना दुुरुस्तीचीही कामे होत नसल्याने नागरिकांना रोष आहे. या रोषाचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने धास्तावलेले नगरसेवक फाइल मंजुरीसाठी भटकंती करीत आहेत.
मागील वर्षात कोरोनामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प उशिरा सादर झाला. त्यात लगेच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर फाइल मंजुरीची प्रक्रिया ठप्प होती. यावर्षी नगरसेवकांना कामे करता यावी यासाठी अर्थसंकल्प लवकर सादर केला. परंतु अजूनही प्रभागातील कामांना सुरुवात झालेली नाही.
...
३५० कोटींची तरतूद; पण कामे ठप्पच
२०२०-२१ या वर्षाच्या अर्थसंकल्पात थांबलेली कामे सुरू व्हावी यासाठी ३५० कोटींची तरतूद केली. मनपा सभागृहाच्या निर्देशानंतरही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निधी उपलब्ध केला नाही. परिणामी कार्यादेश झालेली कामे ठप्प होती.
...
७० टक्के निधी खर्च करण्याला मंजुरी
वित्त व लेखा विभागाने महापालिकेच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पातील विविध घटकांवर ७० टक्क्यांपर्यंत खर्च करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार निधी उपलब्ध होत नसल्याने प्रभागातील विकासकामे अजूनही ठप्पच आहेत.
.....
प्रभागातील कामांसाठी तरतूद
वॉर्ड निधी -३१ कोटी
बांधिल खर्च -५५.२३ कोटी
एकूण -८६.२३ कोटी