नागपूर : बोगस दस्तावेजाच्या आधारावर जमिनीवर अवैध कब्जा करणाऱ्या गौरवसिंह बग्गा याच्या टोळीत त्याच्या घरचे सदस्यही सहभागी असल्याचा संशय आहे. प्रतापनगर पोलिसांनी बग्गाचे वडील हरविंदर सिंह बग्गा यांच्या नावावर असलेल्या रजिस्ट्रीसह अनेक दस्तावेज जप्त केले आहे. या दस्तावेजाच्या चौकशीत त्याचे कुटुंबही टोळीत सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. बग्गाला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नंदनवन निवासी विशाल भजनकर याच्या वडिलांच्या जमिनीवर बोगस दस्तावेजाच्या आधारावर कब्जा केल्या प्रकरणी बग्गाला अटक केली आहे. यात बग्गाचे सासरे अशोक खट्टर, साथीदार प्रशांत सहारे, गुरुप्रित रेणु सुद्धा आरोपी आहे. या प्रकरणाचे सूत्रधार सहारे व बग्गा आहे. बग्गाने पीडित विशाल भजनकर याला हरविंदरसिंह यांच्या नावाने रजिस्ट्री दाखविली. तो प्लॉट विशालच्या वडिलांनी विकला असल्याचे सांगण्यात आले. पण विशालला बग्गावर संशय आला. त्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. प्रतापनगर पोलिसांना तपासात हरविंदरसिंह यांनी बनविलेल्या बोगस रजिस्ट्रीसह जमिनीशी संबंधित अनेक दस्तावेज सापडले. प्राथमिक तपासात पोलिसांना दस्तावेज बोगस असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या चौकशीत बग्गा दस्तावेजांची माहिती देण्यास नकार देत आहे. तो पोलिसांची दिशाभूल करीत आहे. तपास अधिकारी एपीआय शिवचरण पेठे याने बग्गाची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पुन्हा कोठडी सुनावली.
- डॉक्टराच्या संपर्कात होता बग्गा
सहा महिन्यापासून पोलिसांची दिशाभूल करणारा बग्गा पोलीस विभागाशी जुळलेल्या एका डॉक्टराच्या व पोलीस कर्मचाऱ्यासह अनेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. हे लोकं बग्गाला अटक होऊ नये म्हणून पोलिसांची दिशाभूल करीत होते. हॉटेल व बार संचालित करणाऱ्या या डॉक्टरने पोलिसांच्या ओळखीचा वापर करून अनेक आरोपींना संरक्षण दिले आहे. यासंदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास अनेकांचा भंडाफोड होऊ शकतो.