लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या सूर नदीवर पिंपळगाव (ता. माैदा) येथील पुलाजवळ बंधाऱ्याची निर्मिती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल यांच्यासह खात (ता. माैदा) परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या बंधाऱ्याच्या निर्मितीमुळे पिंपळगाव परिसरातील किमान गावांमधील पाणी समस्या सुटण्यास मदत हाेणार असल्याचेही शेतकऱ्यांनी मृदा व जलसंधारण विभागाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सूर नदीच्या तीरावर पिंपळगाव परिसरातील किमान १० गावाच्या पाणीपुरवठा याेजनांच्या विहिरी आहेत. मागील काही वर्षांपासून या नदीचे पात्र दरवर्षी फेब्रुवारी ते जून या काळात काेरडे असते. त्यामुळे पाणीपुरवठा याेजनांच्या विहिरींची पाणीपातळी खालावत असून, प्रसंगी त्या काेरड्या हाेतात. त्यामुळे या गावामधील नागरिकांना पाणीटंचाई जाणवते. या भागात धानाचे पीक घेतले जात असून, प्रभावी सुविधांअभावी धानाच्या ओलितासाठी शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. वेळीच पाणी न मिळाल्यास धानाचे उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही हाेते.
या नदीवर पिंपळगाव परिसरातील पुलाजवळ सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती केल्यास बंधाऱ्यातील पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. त्याचा फायदा या भागातील १० गावाच्या पाणीपुरवठा याेजनांना हाेईल. शिवाय, या १० गावासह इतर चार गावामधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध हाेऊ शकते. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकऱ्यांना रबीसाेबतच भाजीपाल्याची विविध पिके घेणे शक्य हाेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल, मुकेश अग्रवाल यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
...
अतिक्रमण हटवा, झाडे लावू
या नदीच्या काठावर तसेच इतर शासकीय जागेवर काहींनी अतिक्रमण केले आहे. उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाने यात हस्तेक्षप करून हे अतिक्रमण हटवावे. त्या खाली जागेवर विविध जातींची झाडे लावून त्यांचे संगाेपन करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे दिली आहे. या झाडांमुळे जमिनीची धूप थांबणार असून, पर्यावरणाचा समताेल कायम राखण्यास मदत हाेणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.