कामाक्षीनगर व अनमोलनगर येथील नागरिकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग क्र. २६ मधील वाठोडा येथील कामाक्षीनगर आणि अनमोलनगर शिवाजी पार्क येथे अमृत योजनेंतर्गत मनपाद्वारे जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे; परंतु हे दोन्ही परिसर दाट वस्तीचे असून, येथील रस्तेही अरुंद आहेत. त्यामुळे हे दोन्ही जलकुंभ पर्यायी जागेवर बांधण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर दयाशंकर तिवारी यांना केली.
शिष्टमंडळात नगरसेविका मनीषा कोठे, नगरसेविका समिता चकोले, अनमोलनगरचे रहिवासी उमेश उतकेडे, पप्पू तितरमारे, कामाक्षी सोसायटीमधील साधना ठोंबरे, विनोद निनावे, शंकरराव ढोबळे आदींचा समावेश होता.
२२ जुलै रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये या जलकुंभांचा विषय सभागृहाच्या पटलावर आल्यानंतर मेश्राम यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर महापौरांना निवेदन दिले. कामाक्षीनगरालगत मनपाची क्रीडा संकुलाकरिता राखीव आठ एकर जागा आहे, या जागेत हे जलकुंभ बांधण्यात यावे, यासोबतच अनमोलनगर शिवाजी पार्क येथील जलकुंभ सिम्बॉयसिसलगत असलेल्या मनपाच्या जागेमध्ये बांधण्यात यावा, अशी मागणी केली.