नागपूर : विदर्भात रिफायनरीशिवाय केवळ पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या आव्हान असलेल्या प्रदेशाच्या विकासासाठी अर्धवट प्रयत्न ठरेल. रिफायनरीच्या अभावमुळे या प्रदेशाला रिफाईंड पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी इतर प्रदेशांवर नेहमीसाठी अवलंबून रहावे लागेल. याची दखल घेत विदर्भात रिफायनरीही उभारण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून केली आहे.
देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, मध्यभारतातील बहुतेक पेट्रोलियम उत्पादनांची मागणी दूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरींकडे होत आलेली आहे. म्हणूनच याचे ओझे ग्राहक व तेल निर्मात्या कंपन्यांवर निर्माण झाले आहे. मध्यभारतात काम करणाऱ्या कोळसा, चुनखडी, मॅगनीज, लोह खनिज, स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादनांची आवश्यकता आहे. ४५० किलोमीटरच्या परिसरात ३० मोठे सिमेंट प्लांट्स, ५ मोठे स्टील प्लांट्स, ३ मोठे ॲल्युमिनियम स्मेल्टर्स आणि वीज निर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची मागणी आहे. कापूस लागवड करणाऱ्या भागांना चांगल्या दर्जाच्या कपड्यांच्या उत्पादनासाठी पॉलिस्टर ब्लेंडिंग करण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाची चांगली किंमत मिळेल. आता रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी किनारपट्टीचे स्थान आवश्यक नाही. किनारपट्टीपासून टाकलेल्या क्रूड पाईपलाईनद्वारे बऱ्याच लॅण्ड रिफायनरी यशस्वीरीत्या कार्य करीत आहेत. खरं तर दिल्ली जवळ तीन मोठ्या रिफायनरी कार्यरत आहेत. पानिपत, भटिंडा, मथुरा सर्वांचा विस्तार होत आहे. त्यामुळे विदर्भातही रिफायनरी सुरु केल्या जाऊ शकतात. विदर्भातील सर्वात मोठ्या रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सद्वारे बेरोजगारी आणि प्रदेशाचा आर्थिक अनुशेष यासारख्या मुद्द्यांचे कायमचे निराकरण केले जाईल. मिहान, एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. या प्रकल्पाद्वारेच त्यांना शक्य तितका चांगला परतावा मिळू शकतो. मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे सोबत पाईपलाइन विकसित केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च वाचवता येईल, असेही देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.