लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.शहरातील वाहतूक समस्यांवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी २२ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची आठवण पोलीस आयुक्तांना करून दिली. सर्व वाहतूक पोलीस सिग्नलवर थांबणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते. त्या आदेशांचे पालन होताना दिसून येत नसल्याची खंत हायकोर्टाने पुन्हा एकदा व्यक्त केली. वाहतूक पोलीस रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबलेले आढळतात. अनेकदा मोबाईलवर खेळत असतात अथवा संभाषण करीत असतात. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होताना दिसून येत नाही, अशी टीकाही न्यायालयाने केली.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असताना त्यावर कुणीही कडक कारवाई का करीत नाही, अशी विचारणा हायकोर्टाने पूर्वी केली होती. पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यावरील मोकाट जनावरे यासारख्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग केल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यानुसार जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १३ हजार ४५९ जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे तर वाहतुकीचे नियम तोडले म्हणून जानेवारी ते जुलै या कालावधीत ७४ हजार ७३३ जणांवर कारवाई केलेली आहे. तेव्हा पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागात केलेल्या कामाचे कौतुक खंडपीठाने केले. परंतु, नियम तोडणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात यावी, शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात यावा, असा आदेश न्यायमूर्तींनी दिला.
पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधा : हायकोर्टाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:25 AM
सिग्नलवर वाहतूक पोलीस दिसत नाहीत. ते रस्त्याच्या बाजूला झाडाखाली उभे असतात. तेव्हा वाहतूक पोलिसांसाठी चौकाच्या मध्यभागी ट्रॅफिक बूथ बांधण्यात यावा आणि त्या ठिकाणाहूनच पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
ठळक मुद्देनियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा