लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील सुरगाव येथे नागपूरच्या एका बिल्डरने काही जणांना हाताशी घेत शेतकऱ्याच्या शेतात बळजबरीने पिकांवर ‘रोडरोलर’ चालविल्याचा संतापजनक प्रकार केला. याप्रकरणी शेतकऱ्याने पाचगाव पोलीस चौकीत धाव घेत लेखी तक्रार दिली. शैलेश एकनाथ बावणे, मिलिंद शामराव मेश्राम असे बिल्डरचे नाव असून, कृष्णा यशवंत कडू असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
यापूर्वीही शैलेश बावणे याने वारंवार धमकी दिल्याची आणि मारहाण केल्याचीही कैफियत शेतकऱ्याने मांडली. कृष्णा कडू यांची सुरगाव येथे १.७६ हेक्टर शेती आहे. सदर शेती विकत घेण्याचा सौदा शैलेश बावणे यांनी केला होता. रजिस्ट्री करण्यासाठी १५ महिन्याचा कालावधी देण्यात आला असताना ठराविक कालावधीत रजिस्ट्री न झाल्याने दोघांमध्ये वादविवाद झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बिल्डर शैलेश बावणे याने शेतकऱ्याचे शेत गाठून हरभरा, वटाणा आणि सांभार या पिकांवर रोडरोलर चालविला. यामुळे उभे पीक उद्ध्वस्त झाल्याची बाब शेतकऱ्याने प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.
शेतातील गोठ्यातून पाईप, खत आणि अन्य साहित्यसुद्धा फेकण्यात आले. शेताची रजिस्ट्री झाली नसताना सदर बिल्डर वारंवार जीवे मारण्याची धमकी देत असल्याने शेतकरी कमालीचे घाबरले असून, बिल्डरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कृष्णा कडू यांनी केली आहे. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्याशी चर्चा केली असता, शेतकऱ्यास पाचगाव पोलीस चौकी येथे पाठवा. मी याप्रकरणी चौकशी करतो असे सांगितले. शेतकऱ्याच्या उभ्या पिकात रोडरोलर चालवून ले-आऊट पाडणाऱ्या बिल्डरविरूद्ध पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.