नागपूर : चर्चेत असलेला बिल्डर गोपाल कोंडावारने विकलेल्या प्लॉटची ३६ महिन्यांत दुप्पट किमतीने खरेदी करण्याची बतावणी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला ३३.५६ लाखांची फसवणूक समोर आली आहे. तपासात ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. फसवणुकीच्या सात वर्षांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
कोंडावारला ७० लाखांच्या फसवणूक प्रकरणात काही दिवसांपूर्वी आर्थिक शाखेने अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी मिळाल्या. काटोल मार्गावरील रहिवासी प्रतिभा नीलकमल महतो यांनी २०१४ मध्ये जगदंबा रिअलेटर्सच्या गोपाल कोंडावारकडून मंगरूळमध्ये चार प्लॉट खरेदी केले होते. कोंडावारने महतो यांना मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग तयार करून दिले होते. त्याने महतो यांना बनावट सातबारा तयार करून दिला. त्याने विकलेले प्लॉट ३६ महिन्यांत दुप्पट किमतीने खरेदी करण्याची बतावणी केली. महतो यांनी कोंडावारला ३३.५६ लाख रुपये दिले होते. महतो आणि त्यांचे पती यांनी निर्धारित वेळ झाल्यानंतर कोंडावारला ते प्लॉट खरेदी करण्याची विनंती केली असता तो टाळाटाळ करू लागला. महतो दाम्पत्याने दुस-या व्यक्तीला प्लॉटचा सौदा केला. ते प्लॉट दाखविण्यासाठी गेले असता तेथे दुस-याच व्यक्तीने घर बांधल्याचे लक्षात आले. महतो यांनी शासकीय विभागातून माहिती घेतली असता प्लॉट दुस-याला विकल्याचे समजले. महतो यांनी पैसे मागितले असता कोंडावार गायब झाला. कोंडावारने महतो यांच्यासारख्याच अनेक लोकांना ३६ महिन्यांत दुप्पट किंमत देऊन प्लॉटची खरेदी करण्याची बतावणी करून प्लॉटची विक्री केली. त्यानंतर नागरिकांना प्लॉट दुस-याला विकल्याची माहिती मिळाली. महतोसह पाच-सहा पीडित आर्थिक शाखेत पोहोचले. त्या आधारे पोलिसांनी सीताबर्डी ठाण्यात फसवणूक तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण अधिनियमानुसार (एमपीडीआय) गुन्हा दाखल करून कोंडावारला अटक केली. आर्थिक शाखेने पीडित गुंतवणूकदारांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तपास उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख करीत आहेत.
...............