लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एक जुनी इमारत मंगळवारी रात्री कोसळली. त्यामुळे इमारतीच्या भिंतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या. राधा शिरसाट (वय ४०), प्रियंका कर्मावत (वय २६), पुनम कर्मावत (वय २५) आणि साक्षी कर्मावत (वय २४) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.गंगाजमुना परिसरात नामदेव रेवतकर यांच्या मालकीची ही जुनी इमारत आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जीर्ण झालेली ही इमारत कोसळली. यावेळी इमारतीलगतच्या शेड मध्ये राधा, प्रियंका, पुनम आणि साक्षीसह आणखी काही महिला- तरुणी नेहमीप्रमाणे उभ्या होत्या. अचानक भिंतीचा मलबा अंगावर पडल्याने त्यात उपरोक्त चौघी दबल्या. अन्य महिला आणि तरुणी आरडाओरड करीत तेथून मुख्य मार्गाकडे पळाल्या. मलब्याचा काही भाग त्यांच्याही अंगावर पडला. मात्र, त्यांना फारशी दुखापत झाली नाही.गंगाजमुना परिसरात २४ तास वर्दळ असते. इमारत पडल्याने तेथे उभ्या असलेल्या तरुणी-महिलांनी आरडाओरड केली. ती ऐकून परिसरातील मंडळी तिकडे धावली. मोठ्या संख्येतील नागरिकांनी मलब्यात दबलेल्या महिला-तरुणींना बाहेर काढण्याचे लगेच प्रयत्न सुरू केले. पोलीस आणि अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचेपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. मलब्यात दबलेल्या चौघींनाही बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले.श्वानाचा मृत्यूइमारतीच्या भिंतीच्या मलब्यात उपरोक्त तरुणींसोबतच एक श्वानही दबला. या मुक्या जीवाची तातडीने मदत करण्याची कुणाला गरज वाटली नाही. त्यामुळे त्याचा मलब्यात दबून मृत्यू झाला. एका दुचाकीची मोडतोड झाली. वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळावर अग्निशमन दलाकडून मलबा हटविण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेमुळे मोठी गर्दी जमल्याने मुख्य मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली होती.
नागपुरातील गंगाजमुनात इमारत कोसळली : मलब्यात दबून चौघी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:06 AM
उपराजधानीतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एक जुनी इमारत मंगळवारी रात्री कोसळली. त्यामुळे इमारतीच्या भिंतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या.
ठळक मुद्देसंततधार पावसामुळे घडली दुर्घटना