लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांवर भाजप सत्तेत आहे. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही भाजपचीच पकड आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. २०१४ पूर्वी जिल्ह्यात देवळी ही एकमेव नगर परिषद भाजपच्या ताब्यात होती मात्र आता सर्व सहा नगर परिषदांवर भाजपचा कब्जा आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांमुळे १२ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवरही भाजपचाच झेंडा आहे. सामान्य माणसांची कामे सहज होत असल्याने भाजपवरचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे वर्धा मतदार संघात अतिशय चांगले वातावरण असल्याची पुष्टी खासदार तडस यांनी जोडली. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाची दखल घेतली जाते. त्याच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो. आतापर्यंत १५ हजार कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा करीत तडस सांगतात, आधी जिल्ह्यात एक राष्ट्रीय महामार्ग होता. आता तब्बल ११ राष्ट्रीय महामार्ग आहेत. १९०० पैकी सुमारे १३०० गावांपर्यंत आपण स्वत: पोहोचलो असून उर्वरित गावातही पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षातील २५ कोटींचा खासदार निधी विकास कामांसाठी खर्च झाल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले. नागपूरनंतर पासपोर्ट कार्यालयाचे पहिले उपकेंद्र वर्धा जिल्ह्यात उघडण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला. सदर उपकेंद्र सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात १२ हजार नवीन पासपोर्ट जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिंदी रेल्वे येथे महाराष्ट्रातील एकमेव ड्रायपोर्ट प्रकल्प साकारला जात असून विकासाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे सकारात्मक पाऊल आहे. कारंजा तालुक्यात सिंदी विहीर येथे मेगा फूड पार्क मंजूर झाल्याचेही ते सांगतात. वर्धा रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेस्थानकाचा विकास होणार. जिल्ह्यात उड्डाण पुलांची कामेदखील सुरू झालेली आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील ६३०० रुग्णांवर मागील दोन महिन्यात उपचार करण्यात आले.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी भागात उत्तमरीत्या राबविण्यात आली असून देवळीमध्ये ८२२ घरांची निर्मिती करण्यात आल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. याशिवाय सात रेल्वे गाड्यांना वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध स्थानकांवर थांबा मिळवून देण्यातही आपल्याला यश आले आहे. पुलगावमध्ये झालेल्या स्फोटच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, ही मागणी आपणच लावून धरल्यामुळे तपासाला गती मिळाली आणि संबंधित व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. विविध कामांचे कंत्राट एकाच माणसाला का, असा प्रश्नही आपण पुलगाव घटनेसंदर्भात उपस्थित केला होता, असेही ते म्हणाले.भाजपचे संघटन मजबूत असल्याने ही निवडणूक भाजपला सोपी जाणार असल्याचे सांगत आपणच यंदा भाजपचे उमेदवार असणार, हेही खासदार तडस यांनी स्पष्ट केले.
उत्तम पक्ष बांधणी हीच भाजपची जमेची बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:53 PM
बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देवर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची लोकमतशी बातचीत