बुकी सोंटू जैनचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 26, 2023 03:33 PM2023-09-26T15:33:08+5:302023-09-26T15:34:37+5:30
जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकला
नागपूर : ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापाऱ्याची ५८ कोटींनी फसवणूक करणारा बहुचर्चित बुकी अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैन याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळला. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.
या गुन्ह्याची मुळे विदेशापर्यंत पोहोचली आहेत. या गुन्ह्यामध्ये सोंटू जैन सामील असल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून दिसून येत आहे. प्रकरणाचा तपास प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठी सोंटू पोलिसांच्या ताब्यात हवा, असे निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदविले.
जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकला. पोलिसांनी १७ कोटींची रोख,१४ किलो सोने व २९४ किलो चांदी तसेच, त्याच्या लॉकरमधून ८५ लाखांची रोख व साडेचार कोटींचे दागिने जप्त केले आहेत.