नागपूर : सिंदखेडराजाजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातानंतर जिवलगांचे काय झाले असेल या विचाराने नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी असून ज्यांना माहिती कळाली त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. आपल्या घरातील व्यक्ती नेमकी कशी आहे याचे नेमके उत्तर मिळत नसल्याने ते हवालदील झाले आहेत.
‘लोकमत’ला एमएच २९ बीई १८१९ या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे. यातील प्रत्येक क्रमांकावर संपर्क केला असता बहुतांश क्रमांक बंद किंवा आऊट ऑफ रिच असल्याचे दर्शवत होते. ज्या क्रमांकांवर संपर्क झाला ते प्रवाशांच्या नातेवाईकांचेच होते. सर्वच नातेवाईकांनी ते घटनास्थळाकडे निघाले असल्याची माहिती दिली व त्यांच्या जिवलगांची स्थिती नेमकी कशी आहे याचीच ते विचारणा करत होते. जे लोक या अपघातातून बचावले आहेत, त्यांची यादी प्रशासनाकडून जाहीर न झाल्यामुळे घालमेल आणखी वाढली होती.
बहुतांश प्रवासी तरुणचदुर्दैवाची बाब म्हणजे या बसमध्ये बहुतांश प्रवासी तरुण विद्यार्थी किंवा नोकरदारच होते. ते पुण्याला नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी जात होते. वर्धा येथील तनिषा या विद्यार्थिनीला तर बारावीनंतर फर्ग्युसनसारख्या मोठ्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली होती व त्यासाठीच ती जात होती. तिची बहीण पुण्याला तिची प्रतिक्षा करत असतानाच अपघाताची वाईट बातमी धडकली. आपली बहीण नेमकी कशी आहे व कुठल्या दवाखान्यात दाखल आहे याचीच माहिती तिच्याकडून घेण्यात येत आहे. तर वर्धा येथील एका कुटुंबातील होतकरू विद्यार्थी तेजस हा पहिल्या नोकरीसाठी पुण्याला निघाला होता. त्याचे नातेवाईकदेखील घटनास्थळाकडे निघाले आहे.