शरद मिरे
भिवापूर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी शेतीपयोगी महत्त्वाची बाब म्हणून बैलबाजार भरविण्यास मुभा आहे. त्यानुसार शुक्रवारी तालुकास्थळी भरलेल्या बैलबाजारात विक्रीसाठी मोठ्या संख्येत बैल दाखल झाले होते. मात्र खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे आढळले.
बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात पेरणीपासून तर उगवणीपर्यंत आणि शेतमाल हातात आल्यानंतर मार्केटमध्ये पोहचविण्यापर्यंतची सर्व कामे यापूर्वी बैलबंडीने व्हायची. मात्र गत काही वर्षांपासून शेतीपयोगी साहित्यात विज्ञान व तंत्रज्ञानाने भर घातली. शेतातील बहुतांश सर्वच कामे यंत्राने होऊ लागली. बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. त्यामुळे वखरणी, डवरणी, पेरणीसह आदी कामे वेळेत पूर्ण होऊ लागली. सद्यस्थितीत बैल आणि बंडी शेतकऱ्यांच्या शेतात दिसणे दुरापास्त झाले आहे. याचाच परिणाम थेट बैलबाजारावर पडला आहे. दर शुक्रवारी तालुक्याचा आठवडी बाजार असतो. याच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यासाठी बैलबाजार भरविल्या जातो. शुक्रवारी भरलेल्या बैलबाजारात अंदाजे २०० वर बैलजोड्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र त्यातुलनेत खरेदीदार ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच होती. भिवापूरचा बैलबाजार सर्वत्र प्रसिद्ध असून नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा येथील शेतकरी मोठ्या संख्येत बैल खरेदी व विक्रीसाठी येथे येतात. मात्र गत काही दिवसापासून या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या मोठी असली तरी, त्यातुलनेत खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या मंदावली आहे.
केवळ दुभती जनावरे अंगणात
ट्रॅक्टरमुळे बैलबंडीचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैल खरेदी करताना दिसत नाही. असले तरी दुभती जनावरे मात्र शेतकऱ्यांच्या अंगणात दिसतात. असमानी संकटाच्या चक्रव्यूहात शेतातील उभे पीक कधी आडवे होईल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत दुभती जनावरे शेतकऱ्यांचा खरा आधार ठरत आहे. गाय, शेळी, म्हैस यांच्या पालनपोषणाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यातून जन्माला आलेल्या जनावरांच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांना मदत होते.