नरखेड : पाण्याच्या हाैदालगत असलेल्या विद्युत खांबाच्या तंगाव्याला वीज पुरवठा प्रवाहित झाला. तंगाव्याला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड तालुक्यातील धाेत्रा (माेहदी) येथे बुधवारी (दि.९) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
धाेत्रा (माेहदी) येथील शेतकरी नामदेव भिसे हे गावालगतच्या पाण्याच्या हाैदावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले हाेते. हाैदाजवळ असलेल्या वीज खांबाला देण्यात आलेल्या तंगाव्यात वीज पुरवठा प्रवाहित झाला. त्या तंगाव्याला स्पर्श झाल्याने विजेचा जाेरदार धक्का लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी भिसे यांचे ५० हजाराचे नुकसान झाले असून, ऐन हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतीच्या मशागतीचा प्रश्न उभा ठाकला आहे. घटनेची माहिती मिळताच कनिष्ठ अभियंता कावळे, लाईनमन दुर्गादास कळंबे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.