मनपाच्या अतिक्रमण पथकाची कारवाई : २० वर्षांपूर्वी लीज समाप्त नागपूर : कॉटन मार्केट चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३५ हजार चौरस फूट जागेवर अवैधरीत्या सुरू असलेले दारूचे दुकान आणि चार बारसह ३५ पेक्षा जास्त दुकाने बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मेट्रो रेल्वेने संयुक्तरीत्या केली. न्यायालयाचा स्थगनादेश रद्द झाल्यानंतर सात दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान पोलिसांचा मोठा ताफा होता. या जागेवर मेट्रो रेल्वेस्थानक बनविण्यात येणार आहे. बार व दुकानाच्या जमिनीची लीज २० वर्षांपूर्वीच संपल्यानंतरही या जागेवर दारूची दुकाने कशी, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मेट्रो व्यवस्थापनाने संयुक्त कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांच्या उपस्थितीत ३५ दुकाने तोडण्यात आली. दोन बारसह पाच दुकानदारांना न्यायालयाने काही दिवसांसाठी स्थगनादेश दिल्याने सायंकाळी ४.३० वाजता कारवाई थांबविण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, कॉटन मार्केटच्या मौजा-नागपूर खसरा क्रमांक-१०६ ची जागा सार्वजनिक आरोग्य म्युझियम मैदान या नावाने ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी या जागेवर कांदे-बटाटे व्यापाऱ्यांसह १९ दुकानदारांना हजारो फूट जागेचा काही भाग लीजवर दिला होता. पण हळूहळू ३५ ते ४० दुकानदारांनी या जागेचा ताबा घेतला. पण जागेच्या लीजधारकांची लीज वर्ष १९९६ मध्ये संपली. त्यानंतर लीजचे प्रकरण न्यायालयात गेले होते. यादरम्यान वर्ष २००० मध्ये डीपी योजनेत या जागेवर पार्किंग प्लाझा बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पण दुकानदार न्यायालयात गेल्यामुळे पार्किंग प्लाझाचा बनला नाही. काही वर्षांपूर्वी शहरात मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर मेट्रो व्यवस्थापनाने कॉटन मार्केट चौकात मेट्रो स्थानकाची गरज पाहता, सरकारी जागेसाठी न्यायालयात बाजू मांडली. अखेर न्यायालयाने नागपूरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो रेल्वेकरिता देण्याचा आदेश दिला. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो रेल्वे आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार बुधवारी सकाळी पोलिसांच्या ताफ्यासह मनपाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई सुरू केली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मनपाचा अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात अभियंता नरेंद्र भांडारकर, मंजू शाह, एस.बी भागडे, जमशेद अली, संजय शिंगणे, शरद इरपाते आणि चमूने केली.(प्रतिनिधी) मेट्रो रेल्वेस्थानक बनणार मेट्रो रेल्वे पारडीपासून सेंट्रल एव्हेन्यू मार्गाने रामझुल्याजवळून कॉटन मार्केट ते मुंजे चौक येथून पुढे जाणार आहे. मुंजे चौक येथे जागा मिळाली नाही. त्यामुळे कॉटन मार्केट येथील जागेची मागणी मेट्रो व्यवस्थापनाने केली. आता या जागेवर मेट्रो रेल्वेस्थानक बनणार आहे.
३५ दुकानांवर चालला बुलडोझर
By admin | Published: December 29, 2016 2:53 AM