नागपूर : बुधवारी महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने बुलडोझर चालवित शहराच्या दहा झोनमध्ये अतिक्रमणाची कारवाई केली. यावेळी विविध भागातील ५५० अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांचे दहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई जोरात सुरू आहे. अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे रस्त्यावर तसेच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. प्रवर्तन विभागाच्या वतीने अवैध बांधकामावर बुलडोझरच्या साह्याने कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात येत आहे. या कारवाईमुळे शहरातील फुटपाथ मोकळे होत आहेत. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ रिकामे होत असल्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई उपायुक्त महेश मोरोणे (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व झोनच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
.........
लक्ष्मीनगर झोनमध्ये फुटपाथ मोकळे
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने लक्ष्मीनगर झोन क्रमांक १ मध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. यात देवनगर ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते खामला रोडवरील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत ५६ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
धरमपेठ झोनमध्ये झोपडे तोडले
- धरमपेठ झोनमध्ये व्हेरायटी चौक ते भोले पेट्रोलपंप आणि अलंकार चौक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर रामदासपेठ येथे अमृत भवन येथील अतिक्रमण हटविण्यात आले. महाराजबाग येथे फुटपाथवर असलेले झोपडे काढण्यात आले. झोनमध्ये एकूण ६३ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला.
लॉनसमोरील मंडप तोडला
हनुमाननगर झोन क्रमांक ३ मध्ये तुकडोजी पुतळा ते मानेवाडा चौक येथे रस्त्यावर असलेले नारळ पाणी विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांचे ठेले हटविण्यात आले. ओमकारनगर चौक येथे संतकृपा लॉनसमोरील मंडप तोडण्यात आला. ओमकारनगर चौक ते शताब्दी चौक येथे फुटपाथवरील अस्थायी अतिक्रमण हटविण्यात आले. तुकडोजी पुतळा चौक ते रेशीमबाग चौक येथे फुटपाथवर येथे असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. झोनमधील ७२ अतिक्रमण हटविण्यात आले.
मनीषनगर आठवडी बाजार हटविला
धंतोली झोनमध्ये गांधीसागर तलाव ते चोर बाजार आणि १३ नंबर नाका ते कॉटन मार्केट परिसरात कारवाई करण्यात आली. यात ६९ अतिक्रमण हटविण्यात आले, तर मनीषनगर आठवडी बाजार पूर्णपणे हटविण्यात आला. नेहरूनगर झोनमध्ये गुरुदेवनगर ते ईश्वरनगर चौक तसेच शीतला माता मंदिर-उमरेड रोड, ताजबाग गेट व ते दिघोरी चौक तसेच पंचवटी आश्रम येथे रस्त्याच्या बाजूचे फुटपाथ मोकळे करण्यात आले. परिसरातील ठेले व दुकान हटविण्यात आले. या भागातील ७८ अतिक्रमण हटवून ११ ओटे तोडण्यात आले.
नाल्यावरील टीनाचे शेड तोडले
गांधीबाग झोनमध्ये संत्रा मार्केट येथे नाल्यावर असलेले सहा जणांचे टीनाचे पक्के शेड तोडण्यात आले, तर लकडगंज झोनमध्ये भारतनगर चौक ते हनुमाननगर चौक आणि भरतवाडा ते भवानी माता मंदिर, पारडी चौक येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले १८ शेड तोडण्यात आले. या परिसरातील ठेले, अवैध दुकाने हटविण्यात आली. या भागात ६२ अतिक्रमण हटवून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले, तर अर्धा ट्रक साहित्य नष्ट करण्यात आले. या भागात ७५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
आशीनगर झोनमधील अतिक्रमणाचा सफाया
आशीनगर झोनमध्ये अशोक चौक ते कमाल चौक तसेच इंदोरा चौक ते टेकानाका व चार खंबा येथे फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. झोनमध्ये ६९ कारवाया करून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
दोन ठेले तोडले, पाच ठेले जप्त
मंगळवारी झोनमध्ये सदर मार्केट ते कबाडी चौक, जरीपटका मेन रोड येथे फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. परिसरातील अवैध ठेले व दुकाने हटविण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांकडून २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
..............