नागपूर - गुंडांच्या दोन टोळ्यात बीअर बारमध्ये वाद झाल्यानंतर एका गुंडाने दुस-यावर गोळीबार केला. प्रतिस्पर्धी गुंडाने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यातील एका बीअर बारसमोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
शुक्रवारी मध्यरात्री जरीपटका बाजाराजवळच्या रॉयल बारमध्ये बेझनबागेतील बबलू उर्फ संतोष रामबहादुर यादव (वय ३०) जानू कावरे आणि अन्य मित्रासोबत दारू पीत होता. त्याच्याच बाजुच्या टेबलवर इंदोरातील रवी रतन बोरकर, कांची, मिथून अन्य काही मित्रांसोबत दारू पीत होता. दारू चढल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे बारमालकाने त्यांना बाद बंद करायचा आहे, असे सांगून बाहेर काढले. रस्त्यावर येताच त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर एका रवी बोरकरने पिस्तूल काढून बबलूवर गोळीबार केला.
प्रसंगावधान राखत बबलू खाली बसल्याने गोळी दुसरीकडे निघून गेली. या प्रकारामुळे घाबरलेल्या बबलू आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. तर, रवी आणि त्याच्या मित्रांनीही तेथून पलायन केले. दरम्यान, गोळीबार होताना पाहिलेल्या एकाने नियंत्रण कक्षात माहिती दिली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाण्यातील ताफा तसेच आजूबाजूच्या भागात गस्तीवर असलेली पोलिसांची पथके तेथे पोहोचली. जरीपटक्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचा संभ्रम घटनास्थळी पोलिसांना एक रिकामे काडतूस (पुंगळी) सापडली. मात्र, गोळीबार नेमका कुणी केला, त्याबाबत पोलीस अधिकाºयांची संभ्रमाची अवस्था होती. सीसीटीव्ही फुटेजची तपासपणी केल्यानंतर पोलिसांना आरोपींची ओळख पटली. त्यानंतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. विशेष म्हणजे, रवी बोरकर हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर बबलू आणि जानू कावरेचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबार करणारे गुंड रामटेककडे मोटरसायकलने पळून गेले. तिकडेही पोलीस पथके रवाना झाली आहेत.