नागपूर : अतिवेगाने बुलेट चालविणाऱ्या चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका तरुणाचा नाहक जीव गेला. देवनगरजवळ बुलेटने दुचाकीला धडकेनंतर संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राकेश निलचंद जैन (४२, देवनगर) असे मृतकाचे नाव आहे. शनिवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ते त्यांच्या मोपेडने मेहुणी प्राची अहाळे हिच्यासोबत इतवारी येथे सामान खरेदी करायला गेले होते. घरी परत येताना बर्डीकडून खामला चौकाकडे येत असताना देवनगरात एमएच २८ बीटी ५६२४ या बुलेटच्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात दोघेही खाल पडले. राकेश यांच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्यांना उपचारासाठी ऑरेंज सिटी इस्पितळात नेले असता उपचारादरम्यान मध्यरात्री राकेश यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मेहुणीवर उपचार सुरू आहेत. राकेश यांचे मोठे भाऊ संजय यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात बुलेटचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.