कुही (नागपूर) : राेडलगत शेळ्या चारत असलेल्या दाेन गुराख्यांना वनरक्षकाने विनाकारण शिवीगाळ करीत आधी उठबशा मारायला लावल्या. त्यानंतर दाेघांनाही काेंबडा करायला लावत बेदम मारहाण केली. यात दाेघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांला उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले आहे. ही घटना उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या दहेगाव (ता. कुही) परिसरात साेमवारी (दि. २८) दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली.
राजेंद्र श्रावण घरडे (५५, रा. रेंगातूर, ता. कुही) व गणेश किसन वासनिक (४५, रा. परसोडी-राजा, ता. कुही) अशी जखमींची नावे असून, महेश कुथे असे मारहाण करणाऱ्या वनरक्षकाचे नाव आहे. दाेघेही साेमवारी दुपारी गोठणगाव-डोंगरमौदा रोडवरील दहेगाव कुटीसमोर त्यांच्या शेळ्या चारत उभे हाेते. महेश कुथे त्यांच्याजवळ आला आणि त्याने दाेघांनाही विनाकारण शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने दाेघांनाही उठाबशा काढायला लावल्या व नंतर त्यांचा कोंबडा करीत काठीने जबर मारहाण करायला सुरुवात केली.
यात दाेघांच्याही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर, दाेघांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारून वनसमिती अध्यक्षाला हा दंड वसूल करण्याचीही महेश कुथे याने सूचना केली. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी दाेघांना वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. शिवाय, पाेलिसत तक्रारही दाखल केली. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी महेश कुथेच्या विराेधात भादंवि ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहेत.
वनरक्षकांची दादागिरी वाढली
महेश कुथे याने दाेन्ही गुराख्यांना काठीने अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्यांना साधे उभे राहणे शक्य नसल्याने वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांनी त्यांच्यावर प्रथमाेपचार केले आणि नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. दाेन वर्षांपूर्वी एका वनरक्षकाने पांढरगोठा व कऱ्हाडला येथील गुराख्यांना अशीच अमानुष मारहाण केली हाेती. प्रशासन या वनरक्षकांना आवर घालत नसल्याने तसेच त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे, असा आराेप स्थानिकांनी केला असून, महेश कुथेला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या वनरक्षकाला त्याच्या वर्तनात सुधारणा करण्याची सूचना केली हाेती. परंतु, त्याच्या वर्तनात सुधारणा हाेताना दिसून येत नाही. त्याने गरीब नागरिकांना त्रास देणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणात पाेलिस नियमानुसार कारवाई करणार आहे.
- सतीश पाटील, ठाणेदार, पाेलिस ठाणे, वेलतूर, ता. कुही.