नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी बंम्पर मतदान झाले. १२२४ मतदान केंद्रावर सरासरी ८२ ते ८५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. यात सरपंचपदाच्या ११८६ तर सदस्यपदाच्या ६८८२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले.
गावागावात तरुण आणि महिलांमध्ये सकाळपासून मतदानासाठी असलेला उत्साह पाहता बहुतांश मोठ्या ग्रा.पं.त दिग्गजांना धक्के बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी तेराही तालुक्यात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी ३ वाजेपर्यंत गावकारभारी कोण, हे स्पष्ट होईल.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावेळी ग्रा.पं. निवडणूक डोक्यावर घेतली होती. गत १५ दिवस गावागावात राजकीय रणधुमाळी झाली. जिल्ह्यात बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजपा विरुद्ध कॉंग्रेस असा सामना झाला. जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार २९१ मतदारांपैकी सकाळी ९:३० वाजेपर्यंत ११.५५ टक्के, सकाळी ११:३० वाजेपर्यंत २६.८१ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजाविला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोड पोलिस बंदोबंस्त तैनात करण्यात आला होता. काही तुरळक वादाच्या घटना वगळता सर्वत्र निवडणूक शांततेत पार पडली.