नागपूर : यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र हा पूर रबी पिकासाठी लाभदायक ठरत आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीची लागवड वाढली आहे. रबीच्या ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातही शेतकरी गव्हापेक्षा हरभरा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठत आहे. त्याचा थेट परिणाम गतवर्षीही रबी पेरणीवर झाला होता. यंदाही पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रबी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात रबी हंगामामध्ये गहू, हरभरा, रबी ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रबीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात रबीमध्ये कृषी विभागाचे १.५५ लाख नियोजित क्षेत्र होते. त्यापैकी १ लाख ५८ हजारावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रबीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३ हजार ६५३ हेक्टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे एकूण नियोजन केले आहे. यंदा रबी हंगामामध्ये गव्हाचे ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ८६ हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र राहणार असून, त्याखालोखाल रबी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे.
गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने, रबीसाठी तो लाभदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला बरसल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचाही प्रश्न जवळपास मिटला आहे. त्यामुळे रबीमध्ये पाणी जास्त लागणाऱ्या गहू व हरभऱ्याची पेरणी वाढून उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने शेतकरी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवडही करीत आहेत. आजघडीला जिल्ह्यात हरभऱ्याची नियोजित क्षेत्राच्या ९० टक्क्यापर्यंत तर गव्हाची २७ टक्क्यावर व ज्वारीची १५ टक्क्यावर पेरणी आटोपलीही आहे.
वाढले रबीचे क्षेत्र
यंदा जिल्ह्यात खरीपामध्ये कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक होता. म्हणजेच नियोजित क्षेत्रापेक्षा २० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली, तर मक्याचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मका व सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे खरीपानंतर त्याच जमिनीवर रबीचाही पेरा घेणे शक्य होत असते, यामुळेही जिल्ह्यात रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अशी झाली पेरणी
पीक क्षेत्र (हेक्टर)
गहू२६१४३
हरभरा६३९९०
ज्वारी१८५
मका १४५
जवस २७
सूर्यफूल१०००
मोहरी३००
भाजीपाला ३८३९