लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात शुक्रवारी तब्बल ३१,२४४ जणांनी कोविड लस टोचून घेतली. यात ग्रामीण आणि शहरातील एकूण ३०,६९१ जणांनी पहिला तर ५५३ जणांनी दुसरा डोस घेतला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जास्त उत्साह दिसून आला.
नागपूर शहरात ८६ केंद्रांवर एकूण १४,३५८ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. यात १३,९७२ जणांनी पहिला डोस आणि ३८६ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ ते ६० वर्षापर्यंतच्या ८,४०४, याच वयातील गंभीर आजाराच्या ९१ आणि ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या ३३३५ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. तसेच ४९४ आरोग्य कर्मचारी आणि १६४८ फ्रंटलाईन वर्कर यांनी लस टोचून घेतली.
ग्रामीण भागातील शासकीय व खासगी केंद्रांवर शुक्रवारी १७,०३३ लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य होते. यापैकी १६,८८६ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. ग्रामीणमध्ये १६७१९ जणांनी पहिला डोस लावला. यात ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ७७६० लाभार्थी, याच वयोगटातील गंभीर आजार असलेले १८१६ आणि ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील ४९४८ जणांनी लस टोचून घेतली. याशिवाय ९५ आरोग्य कर्मचारी आणि १४६४ फ्रंट लाईन वर्करने लस टोचून घेतली. तसेच विविध वयोगटातील १६७ लोकांनी दुसरा डोज घेतला.
संक्रमण वाढत असतानाच प्रशासनााने लसीकरणाची गतीही वाढविली आहे. ४५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे १ एप्रिलपासून लसीकरण सुरु झाल्याने त्याचेही सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.