किशोर बागडे
नागपूर : पुण्याच्या बालसुधार गृहातील १८ वर्षांखालील हे नऊ गुन्हेगार! यातील पाच जणांवर खुनाचा, तिघांवर अट्टल चोरीचा तर एकावर पोक्सो कायद्याचा गुन्हा केल्याचा खटला सुरू आहे. नकळत्या वयात या मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळली. आता तिच पावले फुटबॉल मैदानावर सुधारणेकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या मुलांचे मैदानावरील पदलालित्य पाहताच ते खेळात मोठी झेप घेऊ शकतील, याची खात्री पटते.
क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून ‘स्लम सॉकर’ला देशात ओळख मिळवून देणारे प्रा. विजय बारसे यांनी कोराडी लगतच्या गोधनी येथील फुटबॉल सेंटरवर या मुलांना एका आठवड्यासाठी येथे आणले. त्यांना येथे आणण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी न्यायालयाला विनंती करण्यात आली. बारसे यांच्यावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ चित्रपटात अशाच बालकांची धडपड मांडण्यात आली आहे. बारसे यांचे या क्षेत्रातील काम पाहून न्यायालयाने काही अटींवर फुटबॉलच्या माध्यमातून बदलाच्या प्रयोगास संमती दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील संदेश बोर्डे स्पोर्टस् फाउंडेशनने पुढाकार घेत या गुन्हेगारांना नागपुरात आणले आहे. ‘लोकमत’ने या मुलांशी संवाद साधला. या मुलांचे प्रश्न खूप आहेत... घरची गरिबी, ११व्या वर्गात शिकणारे, मोलमजुरी करणारे आई-वडील, स्थलांतरित कामगारांची मुले, गावातल्या विविध शोषणाला कंटाळून, मायेला, प्रेमाला वंचित होऊन दुर्लक्षित झालेली, वस्तीतल्या भाईगिरी, डॉनगिरीला बळी पडलेली, मोहापायी, घाबरून, वाईट संगतीमुळे ही धोक्याची रेषा ओलांडलेली ही मुले आहेत.
फसव्या मोहाच्या भूलभुलैयात अडकून वास्तव पार नजरेआड करून टाकलेल्या या मुलांना आता यातून बाहेर पडण्याचे मार्ग हवे आहेत. घरचे त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. सर्वांमध्ये थोड्याफार फरकानं पश्चातापाची भावना आहे. बालनिरीक्षण गृहात आल्यानंतर आपापल्या पद्धतीने घडलेल्या घटनांचा विचार करायला लागली.
बदलाचा हा प्रयोग सुरुच राहणार
स्वत: आयटी अभियंता असलेले संदेश बोर्डे यांनी बारसे यांच्या मार्गदर्शनात फुटबॉलचे धडे देणे सुरू केले, दररोज सामने, सराव आणि सुधारविषयक विचारांची मेजवानी या मुलांना मिळत असल्याने सर्वांनी यापुढे हाच खेळ खेळत राहणार, असा निर्धार बोलून दाखविला. यातील काहींनी तर आपल्याला भविष्यात येथेच निवारा द्या, अशी बारसे यांना विनंती देखील केली. सर्वजण आता रविवारी रात्री पुण्याच्या येरवाडा सुधारगृहात परतणार, पण बदलाचा हा प्रयोग सुरूच राहणार आहे.
बालकांकडून नकळत गुन्हा घडला तरी सरसकट 'गुन्हेगार' असा शिक्का मारला जातो. परतीच्या वाटा बंद केल्या जातात. अशा मुलांचे आयुष्य सुरु होण्याअगोदरच बरबाद होते. यांचं काय करायचं? असा प्रश्न मनात आला. विधिसंघर्षग्रस्त मुलांकडे बघण्याची नवी दृष्टी बदलायला हवी, या भावनेतून यापुढे राज्यातील अनेक बालसुधारगृहातील गुन्हेगारांना फुटबॉल शिकविण्याचा आमचा मनोदय असेल.
- प्रा. विजय बारसे, संचालक स्लम सॉकर