नागपूर : डाळ, डाळबिया, खाद्यतेल, बिया यांच्या वाढत्या भाववाढीवर आळा बसावा यादृष्टीने साठेबाजांवर नियंत्रण घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून गोदांमावर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात ३७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यात पाच कोटी पाच लाख नऊ हजार रुपयाचा चणा व सोयाबीनचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी माँ उमिया औद्योगिक वसाहत कापसी येथील पवन भालोटिया यांचे वेअर हाऊस येथील गोदामावर धाड टाकून ४७१० क्विंटल चणा व ५२० क्विंटल सोयाबीन, चौधरी वेअर हाऊस कॉर्पोरेशन येथील गोदामातून ७२ क्विंटल चणा व २६९५ क्विंटल सोयाबीन, तिरुपती बालाजी रोड लाईन्सचे वेअर हाऊस येथून ५०३ क्विंटल चणा व १७८६ क्विंटल सोयाबीन आणि परमहंस वेअर हाऊस येथून १०४६ क्विंटल चणा आणि ३८६ क्विंटल सोयाबीन असे एकूण ६३३१ क्विंटल चणा आणि ५३८७ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आला. या चार गोदामात असलेला हा २९ व्यापाऱ्यांचा साठा होता. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, अन्नधान्य वितरण अधिकारी आर.डी. बेंडे, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)
साठेबाजांना दणका
By admin | Published: October 22, 2015 4:19 AM