हायकोर्ट : सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायमनागपूर : अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. आरोपीची सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील आहे. घटनेच्या वेळी तक्रारकर्ती महिला पाच महिन्यांची गर्भवती होती.रामदास सीताराम मरसकोल्हे (३०) असे आरोपीचे नाव असून तो गजगाव, ता. काटोल येथील रहिवासी आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. असे असतानाही त्याने तक्रारकर्त्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. ती महिला गर्भवती राहिली. आता आपले कूकृत्य जगापुढे येणार अशी भीती निर्माण झाल्यामुळे आरोपीने महिलेच्या हत्येचा कट रचला. घटनेपूर्वी आरोपीने महिलेसोबत कोणत्याही प्रकारचे भांडण केले नाही. परिणामी महिलेला आरोपीवर संशय आला नाही. १७ जून २०१२ रोजी सकाळी आरोपीने चेहरा धुवायचा असल्याचे सांगून महिलेला एका शेतातील विहिरीजवळ नेले. त्याने महिलेला पाणी काढायला लावले. महिलेने एक बादली पाणी काढले. त्यावर आरोपीचे समाधान झाले नाही. महिलेने पुन्हा पाणी काढण्यासाठी बादली विहिरीत टाकली. तेवढ्यात आरोपीने मागून जाऊन महिलेला धक्का दिला. यानंतर आरोपी पळून गेला. दरम्यान, महिला आरडाओरड करीत तब्बल तीन तास विहिरीच्या पाण्यात होती. हात पकडायला आधार सापडल्यामुळे ती पाण्यात बुडाली नाही. दरम्यान, नजीकच्या शेतातील एका शेतकऱ्याने तिला पाण्याबाहेर काढले.२७ आॅगस्ट २०१३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत दोषी ठरवून सहा वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पत्नी व मुले असल्यामुळे दया दाखविण्याची विनंती आरोपीने केली होती. ही विनंतीही फेटाळण्यात आली. कोंढाळी पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयुरी देशमुख यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
गर्भवतीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दणका
By admin | Published: July 04, 2016 2:37 AM