नागपूर : खाजगी बँकेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका दांपत्याने शहरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. एका प्रकरणात या ‘बंटी-बबली’ने एका विवाहितेला तब्बल १९.६७ लाखांनी चुना लावला. गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवत ते लोकांना ‘टार्गेट’ करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिंकेश रुपचंद रामवानी (नारी रोड) व स्नेहा कटारिया-रामवानी (कमलकुंज चौक, जरीपटका) अशी आरोपींची नावे असून ते पती-पत्नी आहेत.
दुर्गा अनिल बिस्ट (२७) यांची २०१८ मध्ये आरोपी दांपत्याशी एका खाजगी बँकेत खाते उघडत असताना ओळख झाली होती. २०२० मध्ये बिस्ट यांना एचडीएफसी बँकेच्या घाट रोड शाखेत खाते उघडायचे होते. त्यामुळे त्यांनी रिंकेशला संपर्क केला. रिंकेशने तो एचडीएफसी बँकेत फिल्ड मॅनेजर असल्याचे सांगून त्यांना खाते उघडून दिले. त्यांच्या खात्यात जास्त रक्कम दिसल्याने रिंकेशने त्यांना बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून दांपत्याने ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२३ या कालावधीत त्यांच्याकडून कधी रोख तर कधी ‘युपीआय’च्या माध्यमातून १९ लाख ६७ हजार रुपये घेतले. मात्र त्यांनी बिस्ट यांना ना व्याजाची रक्कम दिली ना मुद्दल परत केली. दरवेळी ते काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे बिस्ट यांना लक्षात आल्यावर त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दांपत्याविरोधात गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.
दोन्ही आरोपी हे पती पत्नी असुन त्यांनी इतरही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची बाब पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. वेगवेगळ्या बँकांतील खातेदारांना त्यांनी गंडा घातला आहे. त्यात नागपूर शहर व बाहेरगावच्या खातेदारांचादेखील समावेश आहे.