नागपूर : गुंतवणुकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका दाम्पत्याने थोड्याथोडक्या नव्हे, तर ३४२ लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राथमिक तपासानंतर या ‘बंटी-बबली’ने लोकांची ६० लाखांची फसवणूक केल्याचा आकडा निघाला आहे. मात्र, ही रक्कम कोटींमध्ये जाऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
अशोकनगर, सिद्धी कॉलनी येथे राहणारे जितेंद्रनाथ ऊर्फ जितू लल्लुराम गुप्ता (वय ४४) व त्याची पत्नी अंजना ऊर्फ अंजू (३८) अशी आरोपींची नावे आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी नागरिकांना फंडच्या जाळ्यात अडकवायची योजना आखली. त्यांनी सुफी फंड या नावाने गुंतवणूक योजना तयार केली. यात दैनंदिन तसेच इतर गुंतवणुकीचे पर्याय होते. त्यांनी अगोदर पाचपावलीतील अशोकनगरातील गोंड मोहल्ल्यात कार्यालय थाटले. त्यानंतर शहरातील विविध भागातील नागरिकांनी संपर्क केला व बॅंकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल, असे आमिष दाखविले. त्यांनी विविध माध्यमांतून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले व ३४२ लोकांकडून ६० लाख ६७ हजार रुपये गोळा केले. मात्र, रकमेचा परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी काही काळ संयम दाखविला. मात्र, त्यानंतर परत गुंतवणूकदार गेले असता पती-पत्नीने अश्लील शिवीगाळ करत धमकी देण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत त्यांनी लोकांकडून पैसे उकळले. यासंदर्भात महेश लोटनप्रसाद गुप्ता (५१) यांनी पोलिसांत तक्रार केली. पाचपावली ठाण्यातील पथकाने प्राथमिक चौकशी करून गुप्ता दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जितू गुप्ताला अटक केली आहे.
‘कलेक्शन एजंट्स’चीदेखील फसवणूक
गुप्ता दाम्पत्य दोघेच हा संपूर्ण काळा धंदा चालवत होते. त्यांनी लोकांकडून पैसे आणण्यासाठी व गुंतवणूकदारांशी संपर्क करण्यासाठी काही जणांना ‘कलेक्शन एजंट्स’ म्हणून नेमले होते. त्यातील अनेकांचीदेखील दोघांनी फसवणूक केली. तक्रारदार महेश गुप्ता हेदेखील ‘कलेक्शन एजंट’च होते.
नातेवाइकांचीदेखील फसवणूक
गुप्ता दाम्पत्याने सुफी फंडच्या या जाळ्यात सर्वांत अगोदर ओळखीच्या व्यक्तींना ओढले. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांकडूनही पैसे घेतले व परतावा देण्याच्या वेळी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे.