लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगरबत्तीच्या व्यवसायात रक्कम गुंतवणाऱ्यांना लाखोंचा चुना लावणाऱ्या बंटी-बबलीला अखेर गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. ममता मडके आणि प्रमोद खेरडे (दोघेही रा. उदयनगर, मानेवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आकडा पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आरोपी ममता मडके आणि प्रमोद खेरडेने जीबीएस युनिकॉर्न अगरबत्तीच्या व्यवसायात प्रत्येकी १०,५०० रुपयांची गुंतवणूक करण्यास अनेकांना प्रवृत्त केले. अल्पावधीतच तुम्हाला दीडपट रक्कम मिळेल, असे आरोपींनी सांगितल्यावरून अनेकांनी त्यांच्याकडे ९ जानेवारी ते ३० जुलै दरम्यान रक्कम गुंतविली. एवढेच नव्हे तर त्यांनी नंतर इतरांनाही रक्कम गुंतवण्यास सांगितले. कुणी रोख, कुणी फोन पे तर कुणी गुगल पेवरून आरोपींकडे रक्कम दिली. नमूद मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले असता आरोपी टाळाटाळ करू लागले. तुम्ही आमच्याकडे नव्हे तर जीबीएस युनिकॉर्न कंपनीत गुंतवणूक केली आहे. कंपनी रक्कम परत देत नाही तर आम्ही काय करावे, असा प्रश्न करून आरोपी गुंतवणूकदारांना हुसकावून लागले. त्यांनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी ममता-प्रमोदच्या जोडगोळीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून ते फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच बुधवारी हे शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना कळले. त्यावरून गिट्टीखदान पोलिसांनी या दोघांना पाठलाग करून त्यांना बुधवारी सायंकाळी वर्धा मार्गावर पकडले. प्रमोदला बुधवारी रात्री तर ममताला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.
आरोपींचे मुंबई कनेक्शन
आरोपी ममता आणि प्रमोद या दोघांचे मुंबईच्या एका कंपनीशी कनेक्शन आहे. त्यांनी नागपूरसह ठिकठिकाणच्या गुंतवणूकदारांची गिळंकृत केलेली लाखोंची रक्कम मुंबईच्या कंपनीत जमा केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. या दोघांची कसून चौकशी केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात.