नागपूर : एका ज्वेलरी शॉपमधून अज्ञात पुरुष व महिलेने दागिने विकत घेण्याच्या बहाण्याचे हातचलाखी करत २.८० लाखांची चेन लंपास केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
श्रद्धानंदपेठ चौकात पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स आहे. तेथे १२ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत अनोळखी महिला व पुरुष आले. त्यांच्याजवळ एक सोन्याची चेन होती व ती विकायची असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे वजन पाहणे व इतर प्रक्रिया सुरू असता त्यांनी इतर दागिने पाहण्यास सुरुवात केली. काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना २.८० लाख रुपये किंमतीची व ४.२ तोळे वजनाची चेन दाखविली. आरोपींनी हातचलाखी करत ती चेन लंपास केली.
ही बाब २३ जानेवारी रोजी दागिन्यांच्या मोजणीच्या वेळी समोर आली. तेथील व्यवस्थापक प्रशांत कुचे (४०) यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात अनोळखी महिला-पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.