गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली.ते म्हणाले,जीवनावश्यक वस्तूच्या क्षेत्रात हमाल कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत काम करावे, अशी अट आहे तर सध्याच्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या दिवसात पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये असे बंधन आहे. जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येणारे धान्य ट्रक, रेल्वेमधून उतरविण्यासाठी ५० ते १०० वर मजुरांची गरज पडते, ही वस्तुस्थिती आहे. या दिवसात व्यापारी आणि कारखानदार प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करीत आहेत. नागपूर शहरातील दोन औद्योगिक प्रतिष्ठानांमध्ये असे प्रकार घडले. माथाडी कामगारांना डावलून अन्य मजूर आणून माल उरतविला गेला. या दिवसात असे घडत असेल तर, अन्यायकारक आहे.कामगारांच्या स्थलांतराची वाईट अवस्था आहे. लॉकडाऊन होताच अनेक कारखानदार, ठेकेदारांनी देणेघेणे नसल्यासारखे कामगारांना बाहेर काढले. त्यामुळे मजूर गावाकडे निघाले. रस्त्यावर आले. त्यांची व्यवस्था सरकारने संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करायला हवी होती. मात्र त्या आधीच या कामगारांना बाहेर काढले गेले. १५ दिवस काम मिळाले नाही तर जगायचे कसे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आहे.देशतील स्थिती पहिल्यांदाच विपरीतडॉ. धुरट म्हणाले, आजची देशतील स्थिती पाहिल्यावर एवढी भीती यापूर्वी कधीच वाटली नाही. प्लेगच्या वेळी १९२० मध्ये भारत, भूतान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश मिळून १५० कोटी जनता होती. त्यातील ५० कोटी जनतेला प्लेगची लागण झाली. एकाच आठवड्यात ५ कोटी मेले. त्यानंतर मुंबईत स्वतंत्र रुग्णालय उघडले. प्लेगनंतर कॉलरा कोलकतामधून आला व देशभर पसरला. अनेकजण बिना औषधाने मेले. लिप्टन कंपनी आल्यावर यावर औषध मिळाले. स्वाईन फ्लू तर यापेक्षाही वाईट होता. पण या वेळी तर भयावह चित्र आहे. कोरोनामुळे भूकबळीने मरणाऱ्यांच्या धोका अधिक आहे. हातावर पोट असणाऱ्यांनी कसे जगावे, यावर मानवी दृष्टीने उत्तर आजतरी सापडत नाही
सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:29 AM