नागपूर : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने गुन्हेगारी रोखण्यासाठी दीड महिन्यापासून सुरू केलेल्या विशेष धरपकड अभियाना अंतर्गत दीड महिन्यात वेगवेगळ्या ११ प्रकरणाचा छडा लावला आहे. यातील आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हवाली करण्यात आले. त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
अलिकडे रेल्वे स्थानक, परिसर तसेच धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. मिळेल त्या मार्गावर संधी साधून चोर भामटे हात मारतात आणि गायबही होतात. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरपीएफच्या विशेष पथकाने जानेवारी महिन्यापासून विशेष तपास मोहिम सुरू केली. त्यानुसार, रेल्वे स्थानकं, स्थानक परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये गस्त तसेच निगराणी सुरू करण्यात आली आहे. त्याला चांगले यश आले असून, १ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत ११ प्रकरणातील ११ गुन्हेगारांच्या आरपीएफने मुसक्या बांधल्या. नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्हेगारांकडून ३ लाख, २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खास गुन्हेगारांसाठी ...!आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी वेगवेगळे रेल्वे स्थानकं, स्थानक परिसर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये आरपीएफचे एक विशेष पथक २४ तास अलर्ट मोडवर असते. खास गुन्हेगारांना हुडकून त्यांच्यावर कारवाई करण्याचेच या पथकाला टार्गेट देण्यात आले आहे.