दयानंद पाईकराव, नागपूर: घरफोडी करणाऱ्या कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने २४ तासात अटक करून त्याच्या ताब्यातून १ लाख ६२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुजल विक्रांत गहुकर (२०, रा. बहादुरा ग्रामपंचायतजवळ, वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
३ मे रोजी रात्री १० ते ४ मे रोजी सकाळी ९.४५ दरम्यान नितीन यादवराव बावने (२३, रा. नेहरुनगर झोपडपट्टी प्रजापती चौक) हे रुग्णालयात आपल्या ड्युटीवर तर आईवडिल भंडाराला लग्नासाठी गेल्यानंतर त्यांच्या घराचे कुलुप तोडून अज्ञात आरोपीने सोन्याचांदीचे दागीने व रोख २५ हजार असा ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी सुजलला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याच्या सोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालक होते. त्यांनी नंदनवन व हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागीने, रोख १२ हजार ४० रुपये व दुचाकी असा एकुण १ लाख ६२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.