दयानंद पाईकराव, नागपूर : अजनीत तडीपार गुंड बिहारीचा खून झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. पोलिसांनी तडीपार असताना शहरात फिरणाऱ्या गुंडांवर लक्ष केंद्रीत केले आहे. शनिवारी १७ फेब्रवारीला सकाळी ६.१० ते ७.०५ दरम्यान जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली असून त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभरे, (२४, रा. जुनी कामठी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. जुनी कामठी पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक तडीपार आरोपी फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी बैल बाजार, दुर्गा चौक, कामठी येथे पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी सचिन उर्फ वांग्या पोलिसांना पाहून पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत एक लोखंडी धारदार चाकु व खिशात मोबाईल आढळला. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याला पोलिस उपायुक्त झोन ५ यांच्या आदेशाने दोन वर्षांसाठी नागपूर शहर व ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचे समजले.
आरोपीला मोबाईलबाबत विचारना केली असता त्याने जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चकोले यांचे देशी दारुच्या दुकानाचे टिनाच्या दाराचे कुलुप तोडून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल व रोख १६०० रुपये चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चाकु, मोबाईल जप्त करण्यात आला. तडीपार असताना शस्त्र घेऊन फिरत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कलम १४२, १३५, सहकलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.