लोकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : अज्ञात चोरट्याने पाटबंधारे कार्यालयात चाेरी करीत एक प्रिंटर मशीन आणि ऑटाे लेव्हल मशीन असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना काटाेल शहरातील पाटबंधारे उपविभाग कार्यालय, धवड ले-आऊट येथे शुक्रवारी (दि. ५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
विलास कृष्णराव ढाेले (२९, रा. कारंजा) हे कनिष्ठ लिपिक म्हणून पाटबंधारे उपविभाग कार्यालय काटाेल येथे कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयास कुलूप लावून ते चालक राहुल देवरावजी डहाट यांच्यासह घरी गेले हाेते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कार्यालयाच्या मागील दाराची पाटी काढून आत प्रवेश केला. यात चोरट्याने एक प्रिंटर मशीन कॅनाॅन किंमत २० हजार रुपये व १५ हजार रुपयांची ऑटाे लेव्हल मशीन असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी वाहनचालक राहुल डहाट यांनी कार्यालय उघडले असता ही बाब लक्षात येताच विलास ढाेले यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. या प्रकरणी काटाेल पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस हवालदार अरुण भेंडे करीत आहेत.