लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुक्यात वाहन व गुरांच्या चाेरीसह घरफाेडीचे प्रमाण वढत चालले आहे. चाेरट्याने खापा (ता. सावनेर) शहरात घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ३ लाख २२ हजार ४६६ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारी १.१५ ते रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली.
सावनेर शहरात शुक्रवारी आठवडी बाजार भरताे. सरला अरुण खैरकर (४५, रा. मच्छी मार्केट, जुना बसस्टाॅप, खापा, ता. सावनेर) या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्या भाजीपाला विकण्यासाठी सावनेर येथे गेल्या हाेत्या. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. दरम्यान, घरी व घराच्या परिसरात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चाेरट्याने घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील १ लाख २८ हजार ७०० रुपये राेख व १ लाख ९३ हजार ७७६ रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख २२ हजार ४६६ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
सरला खैरकर रात्री घरी परत आल्यावर त्यांना स्वयंपाकघराचे दार उघडे दिसले. घरी चाेरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी लगेच पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत. दुसरीकडे, चाेरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.