लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरची मंडळी लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्याने महालमधील एका घराच्या दाराचे कुलूप तोडून आतमधील रोख ५० हजार तसेच सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एमआयडीसीतही अशीच एक घरफोडीची घटना घडली.
कोठी रोड महाल भागात राहणारे अप्पासाहेब भाऊसाहेब मोहिते (वय ५३) २४ फेब्रुवारीला आपल्या पुतणीच्या लग्नासाठी सहपरिवार मुंबई येथे गेले होते. २६ तारखेला ते परत आले. चोरट्यांनी या दरम्यान त्यांच्या दाराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातून रोख ५० हजार तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख, ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला. मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
अशीच एक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गा चौकाजवळच्या शुभमनगरात घडली. शनिवारी पहाटे १.४५ च्या सुमारास अरुण महगू सिंग (वय ३०) हे घराबाहेर गेले. दुपारी परत आले तेव्हा त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून रोख ५७ हजार आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
----