प्रदीप घुमडवार
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : तालुक्यातून वाहणाऱ्या आमनदीचे पात्र काेरडे पडले असून, काही ठिकाणी डबके तयार झाले आहेत. या नदीवरील मांढळ व पचखेडी येथील घाटांमध्ये अंत्यसंस्कार, रक्षा विसर्जन तसेच डबक्यांमधील पाण्यात अंघाेळ करणे आदी कार्यक्रम पार पाडले जात आहेत. त्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना आजार हाेण्याची व काेराेना संक्रमण बळावण्याची शक्यता बळावली आहे. या नदीच्या उगमावर मकरधाेकडा जलाशय असल्याने ही समस्या साेडविण्यासाठी या जलाशयातील पाणी नदीत साेडणे गरजेचे आहे, असे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त करीत पाणी साेडण्याची मागणी केली आहे.
आमनदी ही कुही तालुक्याची जीवनदायिनी आहे. पूर्वी वर्षभर वाहणारी ही नदी अलीकडच्या काळात काेरडी पडत आहे. या नदीच्या काठी असलेल्या पचखेडी, मांढळ, जीवनापूर व सोनेगाव येथील नागरिक याच नदीच्या काठावर अंत्यसंस्कार, अस्थी व राख विसर्जन व इतर विधी पार पाडतात. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. काेराेना चाचणीचा अभाव असल्याने मृत व्यक्ती ही काेराेना संक्रमित आहे की नाही, याची कुणालाही माहिती नाही.
अंभाेरा (ता. कुही) येथे वैनगंगा नदीत विलीन हाेणाऱ्या आमनदीचा उगम उमरेड तालुक्यातून झाला असून, या नदीवर उगमाजवळ मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारात जलाशयाची निर्मिती केली आहे. या जलाशयातील काही पाणी नदीच्या पात्रात साेडल्यास पात्रातील घाण व कचरा वाहून जाणार असल्याने साफ हाेईल. नदीकाठच्या गावांमधील गुरांना पिण्यास पाणी उपलब्ध हाेईल. या नदीच्या काठावर असलेल्या प्रत्येक गावात घाट असल्याने तेथील नागरिकांनाही या पाण्याचा फायदा हाेईल. काेराेना महामारी लक्षात घेता या नदीच्या पात्रात मकरधाेकडा जलाशयातील पाणी साेडण्याची मागणी केली जात आहे.
...
२५ जणांना परवानगी
शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी अंत्यसंस्कारात केवळ २५ नागरिकांना सहभागी हाेण्याची परवानगी दिली आहे. आम नदी ही उत्तर वाहिनी आहे. या नदीच्या पात्रात जिल्ह्यातील नागरिक अस्थी व राख विसर्जन करतात. पात्रात काही मृतदेह पूर्णपणे, तर काही अर्धवट जळालेले असतात. नागरिक त्यांना लगतच्या डबक्यांमध्ये ढकलून घराची वाट धरतात. त्यामुळे डबक्यांमधील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्याच डबक्यातील पाण्याचा वापर अंघाेळीसाठीदेखील केला जाताे. ही बाब घातक ठरू शकते.
...
इतर आजाराची शक्यता
गत आठवड्यात याच घाटावर रात्री ११ वाजताच्या सुमारास मृतदेह जाळण्यात आला. मृतदेह पूर्णपणे जळण्याच्या आधीच पाण्यात ढकलण्यात आला. दुसऱ्या दिवशी कुत्र्यांनी त्या मृतदेहाचे मांस खाल्ले आणि एका कुत्र्याने परसाेडी (ता. कुही) येथील नागरिकाला चावा घेतला. हा प्रकार काेराेना संक्रमणास किंवा इतर आजार बळावण्यास कारणीभूत ठरू शकताे.