नागपूर : भिवापूर येथील स्थानिक बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएमला बुधवारी सायंकाळी आग लागली. यावेळी एटीएममध्ये १३ लाख ३४ हजार ४०० रुपये जमा होते. मात्र, यातील केवळ १० ते १५ हजार रुपयांच्या नोटांना आगीचे चटके बसले. उर्वरित १३ लाख रुपयांवर रक्कम भीषण आगीतही मशीनमध्ये शाबूत आहे.
एटीएमची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीने घटनेच्या एक दिवसापूर्वी मंगळवारी या एटीएममध्ये १७ लाख रुपये जमा केले होते. दरम्यान, मंगळवार ते बुधवारला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेगवेगळ्या ग्राहकांनी एटीएममधून ३ लाख ६५ हजार ६०० रुपये काढले. त्यामुळे आग लागण्यापूर्वी या मशीनमध्ये १३ लाख ३४ हजार ४०० रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. अशातच सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या एटीएमला आग लागली. यात मशीन आणि रूम पूर्णत: जळाली. त्यामुळे मशीनमधील संपूर्ण रक्कम जळाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती.
दरम्यान, गुरुवारी मुंबई येथून आलेल्या एटीएम चालक कंत्राटी कंपनीच्या पथकाकडून सायंकाळी उशिरापर्यंत एटीएममधील रक्कम बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर मशीन उघडण्यात यश आले. मात्र, आतील दृष्य पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. मशीनच्या आतील बहुतांशी रक्कम पूर्णत: सुरक्षित असल्याचे लक्षात आले. मात्र, तब्बल दीड तास आगीच्या कवेत मशीन राहिल्यामुळे केवळ १० ते १५ हजार रुपयांच्या नोटांना आगीचे चटके बसले. त्यामुळे या थोड्याथोडक्या नोटा काळवंडल्यागत झाल्या आहे. उर्वरित १३ लाख रुपयांची रक्कम शाबूत आहे.
-कंत्राट डिसेंबरमध्ये संपणार होते
हे एटीएम व रुमची देखभाल, दुरुस्ती, रक्कम टाकण्याचे कंत्राट मुंबई येथील एफआयएस कंपनीला मिळाले आहे. अंदाजे १० वर्षांपासून ही कंपनी बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक एटीएमची जबाबदारी सांभाळत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये या कंपनीचे कंत्राट संपणार असून, १ जानेवारी २०२२ पासून सीएमएस या नवीन कंपनीकडे जबाबदारी असणार आहे. त्यामुळे नव्या कंत्राटी कंपनीने गत महिनाभरापूर्वीच नवीन एटीएम मशीन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आणून ठेवली.
शाखा नवीन इमारतीत स्थलांतरित करा
सध्या ज्या तीन मजली इमारतीत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ती इमारत आता जीर्ण झाली झाले. त्यामुळे सर्व सोयी सुविधांनी पूर्ण असलेल्या नव्या इमारतीचा शोध घेऊन ही शाखा इतरत्र स्थलांतरित करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.