लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाविक लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. अशात गणेश मंडळांही तयारीसाठी उत्साही झाले आहेत. १० दिवस विराजमान ठेवण्यापासून आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंतचे नियोजन केले जात आहे. मिरवणूक म्हटले की, पाहणाऱ्या भाविकांसाठी बाप्पाचे आकर्षक रूप आणि शिस्तबद्ध आणि
तालबद्ध गगनभेदी आवाजात वाद्य वाजविणारे ढोलताशा पथक या दोन गोष्टी लक्ष वेधणाऱ्या असतात. त्यामुळे जसे भाविक तयारीला लागले आहेत तसे ढोलताशा पथकही या तयारीला लागले आहेत. ढोलताशांचा गगनभेदी आवाज म्हणजे शिवसंस्कृतीचे प्रतीक. महाराज युद्धावर जाताना उत्साहासाठी आणि युद्ध जिंकून आले की जंगी स्वागतासाठी या आवाजाची गगनभेदी गर्जना व्हायची. आताच्या काळात हा वारसा गणेशोत्सवात अधिक रुढ झाला. पश्चिम महाराष्ट्रात रुजलेला हा वादकांचा संच आता संपूर्ण राज्यात, देशात आणि पाश्चात्त्य देशातही लोकप्रिय ठरला आहे. मात्र हा आकर्षकपणा निर्माण करणे सोपे नसते. त्यासाठी ढोलताशा पथकातील सहभागींना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. हा केवळ वाद्यवृंदांचा संच नव्हे तर ताल, लय आणि शिस्तबद्धता निर्माण करणाऱ्या कलावंतांची उपासना होय.ही उपासना करणाऱ्यांना महिनेन्महिने सराव करावा लागतो, समर्पित व्हावे लागते, तेव्हा कानामनात भिनणारे लयबद्ध रुप त्याला येते. ही उपासना जोपासणारे व गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेल्या विविध ढोलताशा पथकातील छंदिष्ट कलावंतांशी विदर्भ ढोलताशा पथक महासंघाच्या बॅनरखाली लोकमत व्यासपीठमध्ये संवाद साधला.यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात नागपुरात ढोलताशा पथकाची सुरुवात करणारे स्वराज्य गर्जना पथकाचे अनिरुद्ध देशपांडे, शिवमुद्राचे जयंत बैतुले व जय आसकर, शिवसंस्कृतीचे प्रसाद मांजरखेडे, प्रकाश दुर्गे, शिवप्रतिष्ठान पथकाचे पंकज पांडे व शिवगर्जनाचे प्रतीक टेटे सहभागी झाले.
अनेक प्रकारचे परिश्रमपथकात वाद्य वाजविणे सोपे नसते. प्रसादने सांगितले, मिरवणुकीच्या दोन दिवसांआधी वाद्य कलावंतांनाच कसावी लागतात. त्यासाठी प्रचंड मेहनत लागते. उत्सवाची मिरवणूक चार-पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा वरची राहू शकते. पथकातील कलावंत १०-१२ किलोपेक्षा अधिक वजनाचा ढोल कमरेवर बांधून वाजवत चालावे लागते. अनेकदा कलावंतांचे हात सोलले जातात. प्रचंड वजनाचा शिवझेंडा मिरवावा लागतो. गणेश मंडळांकडून कधी ग्लुकोज किंवा इतर आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात. मात्र अनेकदा ते मिळत नाही. मात्र लोकांचे आकर्षण व उत्साह टिकविण्यासाठी हा त्रास बाजूला ठेवून ऊर्जा निर्माण करावी लागते. त्यामुळे एखाद्याने सहभागी होण्याची इच्छा केली तरी त्यांच्या पालकांकडून फिटनेसबाबद परवानगी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक सेवाकार्यात सहभागजय आसकर यांनी सांगितले, ढोलताशा पथक म्हणजे वाजंत्र्यांचा संच नाही. याची सुरुवातच सामाजिक उद्देशातून झाली आहे. त्यामुळे शहरात असलेल्या प्रत्येक पथकांकडून सेवाकार्य चालविले जातात. दरवर्षी रक्तदान, आरोग्य शिबिरे, रस्ता सुरक्षा अभियान आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे कार्य केले जाते. मागील वर्षी काही पथकांनी मिळून केलेल्या रक्तदान शिबिरातून १३८ बॅग गोळा करून रक्तपेढीला देण्यात आल्या होत्या. यवतमाळ येथील पथकाच्या पुढाकराने सर्वांच्या सहभागातून रक्तादानास प्रोत्साहित करण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे. याशिवाय अनाथाश्रम, मतीमंद, दिव्यांगाना मदत करण्याचे काम केले जाते.
रणरागिणींचाही वाढता सहभागढोलताशा पथकात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही सहभाग वाढला आहे. प्रत्येक पथकात चार-पाच किंवा त्यापेक्षा अधिक तरुणी व महिलांचा सहभाग असतो. हा सर्व सराव आणि मिरवणुकीत वाद्य सांभाळण्याचे परिश्रम घ्यावे लागते. त्यांनाही वजनदार ढोल-ताशा कमरेवर बांधावा आणि मिरवणूकभर सांभाळावा लागतो. असे असतानाही त्या उत्साहाने यात सहभागी होतात. त्यामुळे त्यांना रणरागिणी असे संबोधले जात असल्याचे पंकज पांडे यांनी सांगितले.
सामाजिक बदल महत्त्वाचागणेशोत्सवात डीजेच्या तालावर मद्यधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणांना पाहून वाईट वाटत होते. त्यामुळे या तरुणांना उत्सवाच्या वेळी विधायक दिशा देण्यासाठी ढोलताशा पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अनिरुद्ध यांनी सांगितले. आज विविध पथकात ३००० च्यावर तरुण प्रत्यक्ष सहभागी आहेत. त्यांना शिवसंस्कृतीचा ध्यास लागला आहे. हे तरुण वेळ वाया घालविण्यापेक्षा पथकात सराव करतात. त्यामुळे शिस्त आणि संस्कृतीचे महत्त्व त्यांना समजत आहे. यासोबत त्यांच्यात सामाजिक सेवेची जाणीव निर्माण केली जात आहे. पथकात सहभागी मुलांच्या पालकांनीही सकारात्मक बदल होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. संस्कृती आणि सामाजिकतेची संकल्पना ठेवूनच पथक निर्माण झाले असून अशा समविचारी पथकांनाच आमच्या संघटनेत स्थान असल्याचे ते म्हणाले.
नाममात्र मानधनहा व्यवसाय नसून केवळ शिवसंस्कृतीची उपासना आहे. त्यामुळे ही कला विकण्यासाठी नाही. प्रकाश दुर्गे यांनी सांगितले, आमच्या पथकांमध्ये व्यावसायिक हव्यास नाही. कुणाशी स्पर्धा नाही, केवळ पथक केंद्रबिंदू. शिस्त, लयबद्ध वादन, एकीकरण आणि नियमाला धरून चालणारा समूह आहे, ज्यांनी परंपरा आणि शिवसंस्कृतीचा वारसा जोपासण्याचा वसा घेतला आहे. मात्र पथक टिकविण्यासाठी नाममात्र मानधन स्वीकारले जाते. कधी वाद्य फुटले किंवा सहभागी कलावंतांना वैद्यकीय सुविधेसाठी हे मानधन स्वीकारले जाते असल्याचे त्यांनी सांगितले.
शिस्तबद्धतेसाठी सरावप्रत्यक्ष मिरवणुकीच्या वेळी या पथकाची दिसणारी तालबद्धता, शिस्तबद्धता निर्माण होण्यासाठी या कलावंतांना मोठी मेहनत करावी लागते. जयंत बैतुले यांनी सांगितले, आमचे पथक गणेशोत्सवाला तयार होतात. विदर्भात दुर्गाउत्सवालाही महत्त्व असल्याने ते कार्यक्रम करण्याची काही पथकांनी सुरुवात केली आहे. उत्सवाच्या दोन महिन्या आधीपासून कलावंतांचा सराव सुरू होतो. त्यांना शिवस्तोत्र व इतर स्तोत्रांचा सराव, विविध तालामधले बारकावे याचे प्रशिक्षण व नंतर वाद्ययंत्रांचे प्रशिक्षण दिले जाते. तेव्हाच तालबद्धता निर्माण होते. ढोल, ताशा, शंख आणि विशेष महत्त्व असलेला ध्वज मिरविण्याची आवड असते. मात्र नव्याने येणाऱ्या सदस्याला आधी पथकाशी एकरूप व्हावे लागते. त्याचा प्रामाणिकपणा पाहूनच वाद्ययंत्राचे प्रशिक्षण दिले जाते.