योगेश पांडे
नागपूर : घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये ‘रिफिलिंग’ करत त्याचा काळाबाजार करण्याचा गोरखधंदा शहरातील काही भागांमध्ये जोरात सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक अवैध रिफिलिंग केंद्र भरवस्तीत असतानादेखील पोलिसांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. जुन्या वस्त्यांसोबतच आता शहरातील नव्या भागांमध्ये अवैध रिफिलिंगची केंद्रे उघडण्यात येत असून गॅस पुरवठादारांना हाताशी धरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. बेलतरोडीत अशाच एका केंद्रामध्ये ‘रिफिलिंग’ करताना आग लागली. यावेळी थोडक्यात मोठा स्फोट टळला अन्यथा जीवितहानी झाली असती. भरवस्तीत प्राणघातक दुर्घटना झाल्यावर पोलिसांना जाग येणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुरुछाया सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीत मदनमोहन व बॉबी या दोन आरोपींनी मिळून अवैध रिफिलिंग केंद्र सुरू केले होते. वस्तीतील रिकाम्या प्लॉटवर एका टिनाच्या खोलीत हा प्रकार सुरू होता. तीन दिवसांअगोदर घरगुती वापराचा सिलिंडर्समधून व्यावसायिक सिलिंडर्समध्ये गॅसची रिफिलिंग सुरू असताना रात्री नऊ वाजल्यानंतर अचानक गॅस लिक झाला व आग लागली. त्यात एक आरोपी भाजला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. दोघांनीही तेथून लगेच दवाखान्याकडे धाव घेतली व जाताना त्यांनी परिचयातील गॅस डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली. भारत गॅसमध्ये काम करणारे दोन्ही कर्मचारी वेळेत प्लॉटवर पोहोचले व त्यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली व अवैध सिलिंडर्स बाजूला केले. जर त्यांना यायला वेळ झाला असता तर मोठा अपघात होण्याचा धोका होता. पोलिसांचे पथक पोहोचले तेव्हा दोघेही आग विझवतच होते तर प्रवेशद्वारावजळ काही सिलिंडर्स असलेली ई-रिक्षा उभा होती. पोलिसांनी मदनमोहन व बॉबी तसेच ई-रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नोझल, ‘बासरी’ पाईप ठरू शकतात काळ
सर्वसाधारणत: गॅस रिफिलिंग करताना अवैध केंद्रांमध्ये १०० रुपयांचे नोझल आणि स्थानिक फॅब्रिकेटर्सकडून तयार करण्यात आलेल्या लोखंडी पाईपचा उपयोग करण्यात येतो. त्याच नोझल व पाईपमधून गॅस लिक होण्याचा सर्वाधिक धोका असतो आणि त्यातून मोठी दुर्घटना घडू शकते. न्यू मनीषनगरमधील घटनेत नोझलमधूनच गॅस लिक झाल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले.
भर वस्तीतील गैरप्रकारांची माहिती कशी नाही?
काही महिन्यांअगोदर मानेवाडा व शांतीनगर परिसरात अशा प्रकारच्या अवैध रिफिलिंग केंद्राचा भंडाफोड झाला होता. वाडीमध्येदेखील लपुनछपून अशा प्रकारची केंद्रे चालविली जातात. आता बेलतरोडीसारख्या रहिवासी भागातील अवैध केंद्राचे रॅकेटदेखील समोर आले आहे. भारत, एचपी, इंडियन या कंपन्यांच्या घरगुती सिलिंडर्समधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडर्समध्ये भरण्यात येत होता. भरवस्तीत हा प्रकार सुरू होता. मात्र, प्रशासन व पोलिसांना याची कुठलीही कल्पना नव्हती. भरवस्तीतील गैरप्रकारांची पोलिसांना माहिती कशी होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.