अमेरिकेतील भगिनींनी पार पाडले कर्तव्यनागपूर : अमेरिकेत रहिवासी असलेल्या तीन मुलींच्या आईचा सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासात प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. त्यांच्या बहिणीचे पती सोबत असल्यामुळे त्यांनी नागपुरात त्यांचा दफनिधी केला. दहा दिवसानंतर अमेरिकेतील दोन मुली नागपुरात आल्या. लोहमार्ग पोलिसांना पुरलेला मृतदेह परत देण्याची विनवणी केली. पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला. त्यानंतर अमेरिकेतून आलेल्या दोन बहिणींनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार करून अस्थिविसर्जन केले अन् लोहमार्ग पोलिसांना कोटीकोटी धन्यवाद दिले.उमादेवी विनोद शर्मा (७०) रा. व्हर्जेनिया सेंट्रवेल अमेरिका या मूळच्या हैदराबाद येथील रहिवासी. अमेरिकेत त्यांच्या तीन मुली राहतात. हैदराबादला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी त्या अमेरिकेवरून भारतात आल्या होत्या. रेल्वेगाडी क्रमांक १२२८५ सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेसने आपल्या बहिणीच्या पतीसोबत प्रवास करताना अकस्मात प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांनी गाडीखाली उतरविला. नागपुरातील मोक्षधाममध्ये मृतदेहाचा दफनविधी केला. परंतु दहा दिवसानंतर मृत महिलेच्या अमेरिकेत राहणाऱ्या नलिनी जोसेफ डॅनियल आणि मीनाक्षी शॉन बिफली या नागपुरात आल्या. आपल्या आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्याची विनंती त्यांनी लोहमार्ग पोलिसांना केली. लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन नायब तहसीलदारासमक्ष मृतदेह बाहेर काढून त्यांच्या मुलींना सोपविला. त्यानंतर मोक्षधाम घाट येथे मुलींनी आपल्या आईवर अग्निसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी आईच्या अस्थी घेऊन त्या विसर्जित केल्या. महिनाभरानंतर नलिनी जोसेफ डॅनियल या अमेरिकेतून नागपुरात आल्या. त्यांनी लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजीव जैन यांना दूरध्वनी करून तसेच पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)नाही विसरल्या भारतीय संस्कृतीमातेचा दफन केलेला मृतदेह ताब्यात देण्याची विनंती अमेरिकेतील मुलगी नलिनी जोसेफ डॅनियल हिने करताच लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी तुमच्या नातेवाईकांनीच दफनविधी केला, परत मृतदेह तुम्हाला कशाला हवा, अशी विचारणा केली. परंतु आईने जीवनभर जे संस्कार केले त्याच संस्काराचे पालन करण्यासाठी मृतदेह ताब्यात हवा असल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले. यावरून अमेरिकेत राहूनसुद्धा या मुली भारताची संस्कृती विसरल्या नाहीत, याची प्रचिती आली.
दफन केलेला मृतदेह काढून केले अंत्यसंस्कार
By admin | Published: May 25, 2016 2:48 AM