नागपूर: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने बुधवारी, २४ जानेवारीला ‘चालक दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी अपघातमुक्त सेवा देणाऱ्या तसेच डिझेलची बचत करणाऱ्या ४० बस चालकांचा सत्कारही केला जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणच्या बस आगारातही असेच कार्यक्रम पार पडणार आहेत.
असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंगने (एएसआरटीयू) २४ जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देशातील सर्व परिवहन उपक्रमांना दिले आहेत. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातील सर्व आगारांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून बस चालकांचा सत्कार केला जाणार आहे.
१५ ते २० वर्षांत कोणताही अपघात न करता प्रवाशांची ने-आण करणाऱ्या अर्थात प्रवाशांना अपघातमुक्त सेवा देणाऱ्या प्रत्येक आगारातील पाच चालकांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाच्या बसची, इंजिनची स्थिती चांगली नसतानादेखील कमी डिझेलमध्ये जास्त किलोमीटर बस चालविणाऱ्या पाच बस चालकांचाही सत्कार केला जाणार आहे. याच कार्यक्रमात आरटीओ आणि खासगी रुग्णसेवा देणाऱ्यांकडून सुरक्षित बस कशी चालवावी, आरोग्याची कशी काळजी घ्यावी, त्यासंबंधाने धडे (पीपीटी) दिले जाणार आहे. या कार्यक्रमात बसचालकांना सेफ्टी किट आणि रात्रीच्या वेळी बस चालविताना डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून नाईट व्हिजन गॉगलचे वितरण केले जाणार आहे.
बसस्थानक, परिसर सजणारनागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर शहरातील चारही आगारांचा कार्यक्रम बुधवारी सकाळी १० वाजता पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस, आरटीओ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती गणेशपेठ आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी आज पत्रकारांना दिली. बसस्थानक हार-फुलांनी, पताका आणि फलकांनी सजविले जाणार आहे.