लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मध्यप्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील आंतरराज्यीय बस वाहतूक २० ते ३१ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे.
मध्यप्रदेश परिवहन मंडळाने या संदर्भात गुरुवारी सायंकाळी निर्णय जाहीर केला. एकीकडे विदर्भासह महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना मध्यप्रदेशात २४ तासांमध्ये ९१७ रुग्ण आढळले. त्यानंतर तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेतला. विदर्भातून व विशेषतः नागपुरातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी मध्यप्रदेशात जात असतात. याशिवाय तेथूनदेखील मोठ्या संख्येने प्रवासी येतात. महाराष्ट्राच्या सीमेशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा निर्णय काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश व महाराष्ट्र परिवहन विभागासोबतच छिनवाडा, भोपाळ, इंदोर, बैतुल, मंडला, सागर, देवास, शिवनी, इत्यादी शहरांसाठी नागपुरातून दररोज अनेक खासगी बसेस जातात.