लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनानंतर एसटी महामंडळाने मोजक्या फेऱ्या सुरू केल्या. परंतु यात ग्रामीण भागातील अत्यल्प फेऱ्यांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून ग्रामीण भागातही दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.
सध्या एसटी महामंडळाची ७५ टक्के वाहतूक सुरू आहे. यात महत्त्वाची शहरे आणि नागपुरातून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या गावात तासाला एक बस सोडण्यात येत आहे. परंतु दर तासाला एक बस सोडल्यामुळे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या पाहता या बसेस कमी पडत आहेत. ग्रामीण भागात अधिक फेऱ्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी जोर धरत होती. त्यामुळे एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. आगामी दोन ते तीन दिवसात एसटीची ९० टक्के वाहतूक सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केली आहे. त्यानुसार काटोल, सावनेर, नरखेड, कळमेश्वर, रामटेक आदी महत्त्वाच्या ग्रामीण भागात सध्या दर तासाला असलेल्या वाहतुकीत वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार या गावांना दर अर्ध्या तासाला एक फेरी सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून ग्रामीण भागातील प्रवाशांनाही सुविधा मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणार काम
एसटीच्या फेऱ्या कमी सुरू असल्यामुळे रोजंदारी चालक-वाहकांना रजेवर पाठविण्यात येत होते. त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. परंतु आता नागपूर विभागाने ग्रामीण भागातील फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियमित ड्युटी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
मोठ्या गावातील फेऱ्या पूर्ववत
प्रवाशांच्या मागणीनुसार मोठ्या गावातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने घेतला आहे. शालेय विद्यार्थी फेऱ्या सोडून मोठ्या गावांना दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्यात येतील. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग