लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉलमार्किंगनंतर दागिन्यांवर एचयुआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) घेणे अनिवार्य केल्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. त्यांच्या मते ही नवी हॉलमार्किंगची प्रक्रिया ग्राहकांसाठी प्रतिकूल आणि व्यवसायाच्या विरोधात आहे. अशा स्थितीत देशभरातील सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून एचयुआयडीला कडाडून विरोध दर्शविला.
एचयुआयडी विरुद्ध नागपूरसह विदर्भातील सराफा दुकाने बंद होती. यामुळे १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला. यावेळी इतवारीच्या सराफा बाजारात धर्मकाट्याजवळ सराफा व्यापाऱ्यांनी एचयुआयडी प्रक्रिया हटविण्यासाठी निदर्शने केली. यावेळी नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, विदर्भात १० हजार आणि नागपुरात ३ हजार लहान-मोठे सराफा प्रतिष्ठाने आहेत. एचयुआयडीची सक्ती केल्यामुळे ९० टक्के दुकाने बंद होण्याची शंका आहे.
एचयुआयडीवर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया किचकट आणि खूप वेळ खाणारी आहे. यात दागिन्यांवर सहा आकड्यांचा डिजिटल कोड टाकावा लागतो. त्यानंतर कोड बीआयएस पोर्टलवर अपलोड करावा लागतो. बीआयएसच्या हॉलमार्किंग सेंटरची संख्या खूप कमी असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ लागत आहे. यामुळे आगामी सणात दागिन्यांचा तुटवडा जाणवणार असून व्यवसायावर वाईट परिणाम होणार आहे.
असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात पाच ते सहा हॉलमार्किंग सेंटर सुरु झाल्यानंतर एचयुआयडीची प्रक्रिया लागू करण्याची मागणी सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाला केली होती. परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आंदोलनात विशाल पारेख, राजेश काटकोरिया, रविकांत हरडे, अशोक बखाई, भरत सेठ, चेतन वस्तानी, ललित कोठारी यांच्यासह सराफा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडणार
‘सराफा व्यवसायात सर्वाधिक पारदर्शकता ठेवल्यानंतरही एचयुआयडीची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या विरुद्ध झालेल्या आंदोलनाची केंद्र शासनाने दखल न घेतल्यास सराफा व्यावसायिक तीव्र आंदोलन करणार आहेत. बंद ठेवण्यासह इतर पर्यायही उपलब्ध आहेत.’
-राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन
...............