मनपाचे नवे पार्किंग धोरण : मॉल, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुलातील सशुल्क पार्किंगवर आक्षेप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील बहुसंख्य मॉल, शैक्षणिक संस्था, बँका, सरकारी कार्यालये व व्यापारी संकुलात पार्किंग शुल्क वसूल केले जाते. यात सर्वसामान्यांची सर्रास आर्थिक लूट होत आहे. ही वसुली नियमानुसार आहे की नाही, याची चौकशी करण्यात यावी. नियमबाह्य असल्यास ती बंद करण्यात यावी. अन्यथा पे अॅन्ड पार्किंग व्यावसायिक असल्याने अशा वसुलीवर व्यवसाय कर आकारण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत महापालिकेच्या नवीन पार्किंगच्या धोरणाला मंजुरी देताना दिले. वाहन पार्किंग करताना सरसकट आठ तासाच्या आधारावर शुल्क वसुली केली जाते. बाजारात वा मॉलमध्ये थोड्या वेळासाठी वाहनाचे पार्किंग केले तरी पूर्ण शुल्क द्यावे लागते. त्यामुळे दोन स्लॅबच्या आधारावर पार्किंग शुल्क आकारण्याचा या धोरणात समावेश करण्यात आला आहे. पार्किंगचा मूलभूत सुविधेत समावेश होतो. असे असतानाही मॉल, व्यापारी संकुल, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात पे अॅन्ड पार्किंगच्या नावावर अवैध वसुली सुरू असल्याचा मुद्दा माजी महापौर प्रवीण दटके यांनी उपस्थित केला. या वसुलीला आळा घालण्यासाठी याबाबतच्या नियम व शर्तीचा अभ्यास करण्यात यावा. नियमबाह्य असल्यास सशुल्क पार्किंग तात्काळ बंद करण्यात यावे. नियमाबाह्य नसल्यास त्यावर व्यवसाय कर आकारण्याची सूचना दटके यांनी केली. सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनीही याचे समर्थन केले.
पार्किंग शुल्कावर व्यवसाय कर
By admin | Published: June 21, 2017 2:08 AM