लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बक्कळ नफा मिळतो, असे सांगून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतल्यानंतर टूर प्लॅनर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी संबंधित व्यावसायिकाचा विश्वासघात केला. संदीप परमानंद अग्रवाल (वय ४६), असे या प्रकरणातील फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी आपल्याला चार कोटींचा गंडा घातल्याची तक्रार केल्यामुळे नंदनवन पोलिसांनी गोकुळपेठेतील टूर प्लॅनर देवेंद्र गोविंद गोयल, निकिता देवेंद्र गोयल, रितेश गोविंद गोयल, गोविंद मुरालीलाल गोयल आणि अनिता गोविंद गोयल (सर्व रा. ४६०, गोविंद भवन, गोकुळपेठ) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.वर्धमाननगरात राहणारे व्यावसायिक संदीप अग्रवाल यांची आर्थिक समृद्धी बघता आरोपी गोयल परिवारातील सदस्यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्याशी सलगी वाढवली. त्यांच्यासोबत घरगुती संबंध प्रस्थापित केल्यानंतर, त्यांना २०१६ मध्ये फॅमिली टूरचे आयोजन करून दुबईला नेले. टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात मोठा नफा आहे, असे सांगून त्यांना फॉरेन एक्सचेंज लिमिटेडचे लायसन्स दाखविले. वर्षाला मोठा नफा मिळवून देतो, अशी थाप मारून गोयल कुटुंबीयांनी अग्रवाल यांना या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, १० आॅगस्ट २०१६ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत अग्रवाल यांनी आरोपी गोयल कुटुंबीयांकडे ४ कोटी ९९ लाख रुपये आरटीजीएसमार्फत दिले. त्यातील केवळ २ कोटी ३१ लाख ४७ हजार रुपये आरोपींनी अग्रवाल यांना परत केले. उर्वरित २ कोटी ६७ लाख ५२ हजार आणि व्यवसायात झालेल्या नफ्याचे १ कोटी २३ लाख १९ हजार असे सुमारे ३ कोटी ९० लाख रुपये आरोपींनी हडपले. वारंवार मागणी करूनही आरोपी गोयल कुटुंबीय रक्कम देत नसल्याचे पाहून अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.वरिष्ठ पातळीवरून तपासगुन्ह्यातील तक्रारदार, आरोपी आणि रक्कम बघता या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवरून तपास झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा प्रदीर्घ तपास केला. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात व्यावसायिकाला चार कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:05 AM
टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बक्कळ नफा मिळतो, असे सांगून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतल्यानंतर टूर प्लॅनर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी संबंधित व्यावसायिकाचा विश्वासघात केला.
ठळक मुद्देटूर प्लॅनरचे कटकारस्थान : एकाच परिवारातील पाच जणांवर गुन्हा दाखल