लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे तीव्र आर्थिक कोंडी झाल्याने एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर सदर परिसरात खळबळ उडाली. उपेंद्र ताराचंद महादुले (वय ४८) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते राज नगरात राहात होते.महादुले बंधूचे सदरच्या गांधी चौकात जैन होस्टेलमध्ये बिछायत केंद्र आहे. ते कॅटरिंगचाही व्यवसाय करायचे. कोरोनाच्या संकटामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. शनिवारी दिवसभर ते त्यांचे मोठे बंधू जितेंद्र महादुले यांच्यासोबत बिछायत केंद्रात बसून होते. सायंकाळी ६ वाजता ते टेरेसवर गेले. त्यानंतर त्यांच्या भावाने खालून कुलूप लावून बिछायत केंद्र बंद केले आणि घरी निघून गेले. रात्रभर उपेंद्र महादुले घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर अनेकदा संपर्क केला. परंतु वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सकाळी ८ च्या सुमारास उपेंद्र यांची पत्नी आणि मुलगा दुचाकीने केंद्रात आले. त्यांनी टेरेस गाठले असता तेथे एका रूममध्ये उपेंद्र गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लगेच नातेवाईकांना कळविले.त्यानंतर सदर पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले उपेंद्र यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला.
आर्थिक कोंडीमुळेच आत्मघातपोलिसांनी उपेंद्र यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तेथे एक सुसाईड नोट सापडली. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे आत्महत्या करत असल्याची माहिती उपेंद्र यांनी लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त केली. जितेंद्र महादुले यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी सायंकाळी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.